Gaza : गाझामध्ये शंभरांहून अधिक ट्रक्सची लुट अन् मुलांची अन्नासाठी कचराकुंड्यांत धडपड

गाझा : इस्रायल-हमास युद्धामुळे गाझातील २३ लाख लोकांना दारोदारी भटकंती करावी लागत आहे. मागील १५ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गाझामधील सर्वसामान्य लोकांवर सर्वात वाईट परिस्थिती कोसळली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Dec 2024
  • 07:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

संयुक्त राष्ट्राच्या रसदींच्या वाहनांवर हल्ले, २३ लाख लोकांवर भटकंतीची वेळ

गाझा : इस्रायल-हमास युद्धामुळे गाझातील २३ लाख लोकांना दारोदारी भटकंती करावी लागत आहे. मागील १५ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गाझामधील सर्वसामान्य लोकांवर सर्वात वाईट परिस्थिती कोसळली आहे. उत्तर गाझामध्ये जिथे इस्रायलने पहिला हल्ला केला तिथे सर्वाधिक बिकट स्थिती आहे. संयुक्त राष्ट्रांकडून (युएन) पाठवले जाणारे मदत साहित्य वाटेत लुटले जाते. अलीकडील ऑक्सफॅमच्या अहवालानुसार वाटेत शंभरांहून अधिक ट्रक लुटले गेले. तर गेल्या अडीच महिन्यांत केवळ १२ ट्रक मदत सामग्री उत्तर गाझाला पोहोचली. या ठिकाणी परिस्थिती इतकी भीषण आहे की लोक उपासमारीने मरण्याच्या मार्गावर आहेत.

महिला व बालकांना कचऱ्याच्या ढिगातून अन्न उचलून खावे लागत आहे. ऑक्सफॅमचा आरोप आहे की, इस्रायल ६ ऑक्टोबरपासून जबलिया, बीत लाहिया आणि बीट हानौनचा लष्करी वेढा जाणूनबुजून वाढवत आहे. असे करून तो उत्तर गाझामध्ये मदत सामग्री पोहोचवण्यापासून रोखत आहे.

गाझामध्ये राहणारे लोक सांगतात की, कुटुंबातील वडीलधारी मंडळी मुलांना खेळण्यास मनाई करतात, जेणेकरून त्यांना चक्कर येऊ नये. १५ लोकांच्या कुटुंबाकडे खाण्यासाठी बिस्किटांचे एकच पाकीट आहे. एका ताडपत्रीची किंमत १५ हजार रुपये आहे. तंबू बनवण्यासाठी ५ ताडपत्री (७६ हजार रुपये) लागतात. वीज येण्याची शक्यता नाही.

एका कर्मचाऱ्याने नोंदवले की एक संपूर्ण कुटुंब देर अल-बालाह भागात तुटलेले हाड असलेल्या नातेवाईकाला कॅल्शियम देण्यासाठी अंडी शोधत आहे. अंड्याची किंमत सुमारे ५०० रुपये होती.

मदतीचे काफिले लुटणारी शबाबची टोळी
रिलीफ ट्रकच्या वाहतुकीत गुंतलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, गाझामधील सर्वात मोठी दरोडेखोर टोळी यासर अबू शबाबची आहे. पूर्व रफाहच्या नत्रा भागात त्याच्या टोळीचे वर्चस्व आहे. तो राफेहचा माफिया आहे. २५ नोव्हेंबर रोजी हमासने हल्ला चढवला ज्यात अबूच्या भावासह २० लोक मारले गेले. इस्रायली लष्कर गाझामध्ये मदत साहित्य लुटणाऱ्या टोळीला पाठबळ देत असल्याचा आरोप हमासने केला आहे. शबाब टोळीने आतापर्यंत शंभरहून अधिक ट्रक लुटल्याचा दावा केला जात आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासचे सैनिक हे मदत साहित्य लुटत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest