संग्रहित छायाचित्र
सियोल: दक्षिण कोरियात रविवारी विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघात इतका मोठा होता की, यामध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातात 120 जणांचा मृत्यू झाला आहे. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरून भिंतीवर आदळल्यानं अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसर, या विमानामध्ये एकूण 181 प्रवासी प्रवास करत होते. जेजू एअरचं हे विमान थायलंडमधील बँकॉकहून परत येत होते आणि लँडिंग करत असताना हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि काँक्रीटच्या अडथळ्यावर आदळले, त्यामुळे त्याला आग लागली. हा देशातील सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक आहे.
योनहाप या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बचाव मोहीम सुरू आहे. यात आतापर्यंत दोन जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. यात एका प्रवाशाचा आणि एका विमान कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
सर्वात मोठा अपघात
दक्षिण कोरियाच्या विमान वाहतूक इतिहासातील हा सर्वात प्राणघातक अपघात आहे. यापूर्वी 1997 मध्ये दक्षिण कोरियातील ग्वाममध्ये कोरियन एअरलाइन्सचे विमान कोसळले होते, त्यात 228 जणांचा मृत्यू झाला होता.