संग्रहित छायाचित्र
सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची बिग बॅश लीगच्या पुढील हंगामासाठी सिडनी थंडर्सचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो ख्रिस ग्रीनची जागा घेणार आहे.
सिडनी थंडर्स फ्रेंचायझीने बुधवारी (दि. ६) याबाबत माहिती दिली. वॉर्नरने यापूर्वी २०११ मध्ये या फ्रँचायझीचे नेतृत्व केले होते. ‘‘थंडरचे नेतृत्व करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी सुरुवातीपासूनच संघाचा एक भाग होतो. पुन्हा नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने खूप छान वाटते. मी फ्रँचायझीचे नेतृत्व करण्यास आणि युवकांसोबत माझा अनुभव शेअर करण्यास उत्सुक आहे,’’ असे तो म्हणाला.
१२ दिवसांपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्तन आयोगाने वॉर्नरवरील आजीवन कर्णधारपदाची बंदी उठवली होती. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. वॉर्नरव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट हेदेखील बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले होते, त्यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची क्रिकेट बंदी घालण्यात आली होती. वाॅर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बंदी मागे घेण्याचे आवाहन केले होते.
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादला इंडियन प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन बनवले आहे. हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ८ धावांनी पराभव करून २०१७६ च्या मोसमाचे विजेतेपद पटकावले होते. त्या मोसमात वाॅर्नर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
सिडनी थंडर संघ आता १७ डिसेंबर रोजी ॲडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध पहिला सामना कॅनबेरा येथे खेळणार आहे. फ्रँचायझीला लीगमध्ये केवळ एकच विजेतेपद मिळवता आले आहे. २०१५-१६च्या हंगामात मेलबर्न स्टार्सचा पराभव करून संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी सिडनी थंडर्स संघाने तीन गडी राखून बाजी मारली होती.