प्रातिनिधिक छायाचित्र....
India vs Ireland महिला क्रिकेटमध्ये भारताचा सामना आयर्लंडशी होणार आहे. भारतीय महिला संघ 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग टीम इंडियाचा भाग नाहीत अशा स्थितीत स्मृती मंधाना हिच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मंधाना टीम इंडियाची कर्णधार असेल.
भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. हे सर्व सामने राजकोटमध्ये होणार आहेत. मंधाना भारताची कर्णधार असेल. ती एक अनुभवी खेळाडू आहे आणि तिने अनेक प्रसंगी दमदार कामगिरी केली आहे. दीप्ती शर्मा टीम इंडियाची उपकर्णधार असेल. त्यांच्यासोबत प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. हरलीन धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी तरबेज आहे. नुकतेच तिने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया किती आहे मजबूत...?
अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही भारतीय संघात संधी मिळाली आहे. यष्टिरक्षक फलंदाज उमा छेत्री, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा आणि तनुजा कंवर या संघात आहेत. त्याचबरोबर अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि राघवी बिस्ट यांनाही संधी मिळाली आहे. भारतीय संघ बऱ्यापैकी संतुलित दिसत आहे. अलीकडेच संघानं एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता.
हरमनप्रीत-रेणुका यांना का ठेवले संघाबाहेर ?
वास्तविक, टीम इंडियाने कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंगला विश्रांती दिली आहे. जेव्हा खेळाडू सतत खेळतात तेव्हा त्यांना दुखापत होण्याची शक्यता वाढते. या कारणास्तव, खेळाडूंना अनेकदा विश्रांती दिली जाते. मात्र, हरमनप्रीत आणि रेणुका यांच्या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. बीसीसीआयने फक्त विश्रांती देण्याबाबत सांगितले आहे.
आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघ : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीत साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे