File Photo
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने विनेश फोगटला संपूर्ण देशाची माफी मागायला सांगितली आहे.जास्त वजन भरल्यामुळे विनेशला ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आले.
लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता योगेश्वर म्हणाला,‘‘ विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले होते. जर एखादा खेळाडू अपात्र ठरला असेल तर त्याने संपूर्ण देशासमोर माफी मागितली पाहिजे की माझ्याकडून चूक झाली, मी पदक गमावले. पण त्याला वेगळे स्वरूप देण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप झाले.’’
भारताची चुकीची प्रतिमा निर्माण झाली : योगेश्वर विनेश फोगाटने काँग्रेसच्या तिकिटावर हरियाणाची निवडणूक लढवल्याच्या मुद्द्यावर योगेश्वरने एका कार्यक्रमात सांगितले की, ‘‘राजकारणात जाणे हा वैयक्तिक निर्णय आहे, पण देशाला सत्य कळले पाहिजे, मी एवढेच म्हणेन की ज्या घटना घडल्या आहेत.
गेल्या वर्षभरात घडलेल्या घटना, ऑलिम्पिकमधील अपात्रतेचे असोत किंवा जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन असो, भारताची चुकीची प्रतिमा निर्माण केली आणि जगभर त्याचा चुकीचा प्रचार केला.’’ योगेश्वरने लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते.