विराटच्या फॉर्मवरून वातावरण टाईट, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने केली टीका; गंभीर म्हणतो, भारतीय क्रिकेटशी पाँटिंगचा काय संबंध

विराट कोहलीच्या फॉर्मवरून भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध, असे सुनावत गंभीरने पाँटिंगवर खरपूस टीका केली आहे.

India,head coach, Gautam Gambhir,Ricky Ponting ,Australia, Virat Kohli

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या फॉर्मवरून भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध, असे सुनावत गंभीरने पाँटिंगवर खरपूस टीका केली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. मात्र गंभीर येथेच थांबला नाही. त्यानं विराटच्या फाॅर्मबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या पाँटिंगलाही फटकारलं. 

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी कोणत्याही प्रकारचे दडपण नाकारले आहे. रिकी पाँटिंगच्या वक्तव्यावर तो म्हणाला की त्याने आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी गंभीरने पत्रकार परिषद घेतली. गंभीर अशा वेळी मीडियासमोर होता, जेव्हा टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून कसोटी मालिका ३-० अशी गमावली होती.

गंभीर म्हणाला, "मी कोणत्याही दबावाखाली नाही. बॉर्डर-गावसकर सीरीजमध्ये संघातील वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करतील. जर रोहित पर्थ कसोटीत उपलब्ध नसेल, तर बुमराह कर्णधारपद स्वीकारू शकतो."टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पाच  कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणार आहे. शेवटची कसोटी ३ ते ७ जानेवारीदरम्यान खेळवली जाईल.

 विराट-रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. न्यूझीलंडने क्लीन स्वीप केला. रोहित शर्माने ३ सामन्यात एकूण ९१ तर कोहलीने   ९३ धावा केल्या.  या दोघांना अजूनही चांगली कामगिरी आणि धावांची प्रचंड भूक आहे. दोघेही ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. आमच्या ड्रेसिंग रूममध्ये अनेक महान खेळाडू आहेत ज्यांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे, असे गंभीर म्हणाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ मध्ये भारतात झाली होती, जी भारताने जिंकली होती.  

गंभीरवर या मालिकेत खूप दबाव असेल. चांगला निकाल न दिल्यास त्याला भारतीय प्रशिक्षकपदावरून हटवले जाऊ शकते, अशी चर्चा सध्या जोरात आहे. यावर गंभीर म्हणाला, ‘‘ आम्हाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. आम्ही ते उघडपणे स्वीकारत आहोत. आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. पण मी किंवा माझा संघ दबावाखाली नाही. आम्ही ऑस्ट्रेलियात नवीन मालिका खेळण्यास सज्ज आहोत.’’

रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्मा पर्थ येथे होणारी पहिली कसोटी खेळू शकणार नाही, अशी शक्यता आहे. यावर गंभीर म्हणाला की, जर रोहित खेळला नाही तर जसप्रीत बुमराह कर्णधार असेल. तो संघाचा उपकर्णधार आहे. या स्थितीत रोहितच्या जागी केएल राहुल आणि अभिमन्यू इसवरन सलामी करू शकतात.

पाँटिंग नेमके काय म्हणाला?

अलीकडेच पॉंटिंगनं विराटच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले होते. आयसीसीच्या रिव्ह्यूवर बोलताना पॉन्टिंग म्हणाला होता, “मी नुकतीच विराट कोहलीची एक आकडेवारी पाहिली. त्यानं गेल्या पाच वर्षांत फक्त दोन कसोटी शतकं झळकावली आहेत. हे मला योग्य वाटलं नाही. पण हे खरं असेल तर, ही चिंतेची बाब आहे.”

गंभीरचे प्रत्युत्तर

पत्रकार परिषदेत गंभीरला पाँटिंगच्या या कमेंटबद्दल विचारण्यात आलं, यावर चिडून गंभीर म्हणाला, “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं की त्यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दल विचार करायला हवा. मला विराट कोहली आणि रोहित शर्माची चिंता वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही कठोर परिश्रम करतात. त्यांना अजूनही खूप काही साध्य करायचं आहे, जे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”

गंभीरची बोलण्याची पद्धत अयोग्य, त्याला मीडियापासून दूर ठेवा : संजय मांजरेकर

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार निशाणा साधला आहे. गंभीरला माध्यमांशी बोलण्याचा शिष्टाचार नसल्याचं मांजरेकर म्हणाला. सोशल मीडियावर तिखट शब्दात लिहिलेल्या एका पोस्टमध्ये मांजरेकरने बीसीसीआयकडे गंभीरला पत्रकार परिषदांपासून दूर ठेवण्याची विनंती केली. भारतीय संघ पाच  सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीरनं सोमवारी (दि. ११) पत्रकार परिषद घेतली होती.

यासंदर्भात मांजरेकर यांनी  ‘एक्स’वर लिहिले, “मी नुकतेच गंभीरला पत्रकार परिषदेत पाहिले. त्याला अशा कामापासून दूर ठेवणं आणि पडद्यमागे काम करू देणं, हेच बीसीसीआयसाठी शहाणपणाचे ठरेल. त्याची बोलण्याची पद्धत आणि शब्द योग्य नाहीत. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यासाठी योग्य आहेत.”

गौतम गंभीरनं पत्रकार परिषदेत अनेक कठीण प्रश्नांना आत्मविश्वासानं आणि स्पष्टपणे उत्तरं दिली. विराट कोहलीवर टीका करणाऱ्या रिकी पाँटिंगवर त्यानं निशाणा साधला. शार्दुल ठाकूर ऐवजी नितीश रेड्डी याची निवड करण्याच्या निर्णयाचाही त्यानं बचाव केला. याशिवाय, नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे अनुपलब्ध असल्यास, उपकर्णधार जसप्रीत बुमराह पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व करेल, असेही त्याने स्पष्ट केले.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर

राखीव खेळाडू :

मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story