स्वप्नीलची स्वप्नवत कामगिरी!

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने स्वप्नवत कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 2 Aug 2024
  • 03:45 pm
Olympics, paris, Khashaba Jadhav,  Kolhapur's Swapnil Kusale, olyimpics indian athlate, kolhapur, sports

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेला कांस्य, खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू

पॅरिस :कोल्हापूरच्या  स्वप्नील कुसाळेने स्वप्नवत कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.  स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना एकूण ४५१.४ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले.

ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून केवळ खाशाबा जाधव यांना यश आले होते. हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू स्वप्नील याने केला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे असून, ऑलिम्पिकमधील  विशेष योगायोगची चर्चा सुरू आहे.स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले. वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले. शूटिंगमध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही. २०१३ मध्येच त्याला लक्ष्य स्पोर्ट्सकडून प्रायोजकत्व मिळाले.

स्वप्नीलचा आदर्श धोनी

कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीचा मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो. तो म्हणाला, मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते.

ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात यापूर्वी भारताच्या एकाही नेमबाजाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे मुळात अंतिम फेरी गाठणे हेच स्वप्नीलसाठी मोठे यश होते. त्यानंतर आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत त्याच्यासमोर चीनचा विश्वविक्रमवीर लिऊ युकुन आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला चेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरातस्की आदींचे आव्हान होते. चीनच्या नेमबाजाने अपेक्षित यश मिळवताना सुवर्णपदक पटकावले. तिसऱ्या स्थानासाठी स्वप्नील आणि जिरी यांच्यात स्पर्धा सुरू होती. या दडपणाखाली स्वप्नीलने संयम राखत वेध घेतला आणि ‘वर्ल्ड नंबर वन’ला मागे टाकत कांस्यपदक कमावले. युक्रेनचा सेरी कुलिश रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

बालेवाडीत सराव 

स्वप्नील मूळचा कोल्हापूरजवळील कांबळवाडीचा रहिवासी. वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक, तर आई गावची सरपंच. धाकट्या भावाला कबड्डीची आवड, पण पायाच्या दुखापतीमुळे खेळापासून दूर. बहिणीने अभ्यासाला प्राधान्य देत खेळांमध्ये कारकीर्द न करण्याचा निर्णय घेतला. स्वप्नीलने मात्र खेळातच काही तरी करण्याचे ध्येय बाळगले. स्वप्नीलने २००८ मध्ये सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला. पुढील वर्षी खेळ निवडताना नेमबाजीला पसंती दिली. त्याने २००९ ते २०१४ कालावधीत क्रीडा प्रबोधिनीच्या नाशिक केंद्रात सराव केला. त्यानंतर मध्य रेल्वेमध्ये नोकरी मिळाल्यावर तो पुण्यात वास्तव्यास आला आणि तेथे बालेवाडी स्टेडियममध्ये सरावाला प्रारंभ केला. माजी ऑलिम्पिकपटू दीपाली देशपांडे यांचे स्वप्नीलला मार्गदर्शन लाभले. तो मध्य रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून काम करतो. मात्र, नेमबाजीलाही तो तितकाच वेळ देतो.

२०२२ ला कैरोत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील चौथ्या क्रमांकासह स्वप्नीलने भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. त्यानंतर मे २०२४ मध्ये दिल्ली, भोपाळ येथे झालेल्या निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारे त्याला पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. अखेरच्या निवड चाचणीत स्वप्नील पाचव्या स्थानी होता. मात्र, पहिल्या तीन निवड चाचणीमध्ये यशस्वी कामगिरी केल्यामुळे त्याला ऑलिम्पिकसाठी संधी मिळाली अन् भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

चार वर्षांनी पहिले यश 

नेमबाजीला सुरुवात केल्यानंतर चार वर्षांनी २०१५ मध्ये स्वप्नीलने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णयश संपादन केले. ही त्याची पहिली विशेष कामगिरी ठरली. त्याचवर्षी त्याने याच नेमबाजी प्रकारात राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. यावेळी त्याने ऑलिम्पिक पदकविजेत्या गगन नारंगला मागे टाकले होते. त्यानंतर हळूहळू तो ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनकडे वळला. नेमबाजीच्या या प्रकारात मांडीवर बसून (नीलिंग), मग पोटावर झोपून (प्रोन) आणि शेवटी उभे राहून (स्टँडिंग) वेध घेतला जातो. २८ वर्षीय स्वप्नील बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. २०२२ मध्ये त्याने बाकू, अझरबैजान येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक आणि पुरुष सांघिक गटात राैप्य, तर मिश्र सांघिक गटात सुवर्ण अशी तिहेरी पदककमाई केली होती. त्याआधी २०२१ मध्ये दिल्लीतील विश्वचषकातही सांघिक गटात त्याने सुवर्णपदक मिळवले होते. तसेच हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सांघिक गटातील भारताच्या सुवर्णयशात स्वप्नीलची कामगिरी महत्त्वाची होती. २०२३ मध्ये आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतही स्वप्नीलचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदक मिळवले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story