संग्रहित छायाचित्र
मेलबर्न : मेलबर्न कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा यशस्वी जयस्वालसोबत सलामीला फलंदाजीस येण्याची दाट शक्यता आहे. केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारतीय संघ बॉक्सिंग-डे कसोटीत दोन फिरकीपटूंसह उतरू शकतो, अशी माहिती संघव्यवस्थापनातील सुत्रांनी दिली. या कााॅम्बिनेशनसाठी नितीशकुमार रेड्डीला डावलले जाऊ शकते. रेड्डीने पदार्पणातच शानदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. असे असले तरी संघाची गरज म्हणून त्याला वगळले जाऊ शकते.
एक दिवस आधी रोहितने आपल्या फलंदाजीच्या क्रमावर सस्पेंस कायम ठेवला होता. तो म्हणाला होता, ‘‘कोण कुठे फलंदाजी करेल याची काळजी करू नका. आपण याबद्दल विचार करणे आवश्यक आहे आणि मी येथे चर्चा करत नाही. संघासाठी जे सर्वोत्तम आहे ते आम्ही करू.’’
बॉर्डर-गावसाकर ट्रॉफीचा चौथा सामना गुरुवारपासून (दि. २६) मेलबर्नच्या एमसीजीवर रंगणार आहे. रोहित पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला नाही, त्याच्या जागी केएल राहुल सलामीला आला. यानंतर, दोन कसोटींमध्ये राहुलने सलामी दिली आणि रोहित सहाव्या क्रमांकावर आला, पण त्याला केवळ १९ धावाच करता आल्या.
रोहित गेल्या दोन सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळला होता. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. दुसऱ्या कसोटीत तो सलामीवीर म्हणून परतणार होता, पण केएल राहुलने पर्थमध्ये ७७ धावांची दमदार खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
अशा स्थितीत कर्णधाराला आपल्या फलंदाजीचा क्रम बदलावा लागला. मात्र, त्याला तीन डावात केवळ १९ धावा करता आल्या. दुसरीकडे, राहुलने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ८४ धावा करून आघाडीच्या फळीत आपला दावा मजबूत केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.