संग्रहित छायाचित्र
मेलबर्न : जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या बाजूने सामना फिरवला आहे. मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने जबरदस्त गोलंदाजीला सुरुवात केली आणि योग्य लाईन लेंग्थसह कमालीची कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला एका-एका धावेसाठी तंगवले. त्यात जसप्रीत बुमराहने विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. बुमराहने सॅम कॉन्स्टास, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, मिचेल मार्श यांना बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
जसप्रीत बुमराहने सॅम कॉन्स्टसला क्लीन बोल्ड करत भारताला पहिला आणि महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १९९ विकेट्सचा टप्पा गाठला यानंतर बुमराहला २०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेट हवी होती. यानंतर सिराजने उस्मान ख्वाजा आणि स्मिथला बाद केल्यानंतर हेड फलंदाजीसाठी आला. हेड फलंदाजीला येताच बुमराहला गोलंदाजीसाठी पाचारण केले. यानंतर बुमराहने त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याला झेलबाद करत कसोटी क्रिकेटमधील २०० विकेट्स पूर्ण केल्या. यासह जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये ४४ सामन्यांमध्ये सर्वात जलद २०० विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. कसोटीत २०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एकमेव वेगवान गोलंदाज आहे, याशिवाय सर्व फिरकीपटू आहेत.
जसप्रीत बुमराहने कसोटीत २०० अधिक विकेट्स घेण्याचा टप्पा गाठला आहे. जसप्रीत बुमराह आधी जागतिक क्रिकेटमध्ये अनेक वेगवान गोलंदाजांनी २०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. पण या सर्व गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने सरासरीच्या बाबतील पहिलं स्थान गाठलं आहे. २०० विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह १९.५ सरासरीसह पहिल्या स्थानी आहे. त्याच्याखालोखाल मॅल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली एम्ब्रोस हे दिग्गज गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत या चौथ्या कसोटीत एकट्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. सॅम कॉन्स्टासला क्लीन बोल्ड करत भारताने चांगली सुरुवात केली. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडला झेलबाद करत बुमराहने त्याला स्वस्तात माघारी धाडले. आज ट्रॅव्हिस हेडचा वाढदिवस आहे आणि बुमराहने त्याला स्वस्तात बाद करत वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. यानंतर त्याच षटकात मिचेल मार्शला खाते उघडण्याची संधी न देता झेलबाद करत तिसरी विकेट घेतली आणि पुढच्या स्पेलमध्ये अॅलेक्स कॅरीला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला आहे.
कसोटीत २०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची सरासरी
जसप्रीत बुमराह – १९.५ सरासरी
मॅल्कम मार्शल – २०.९ सरासरी
जोएल गार्नर – २१.० सरासरी
कर्टली एम्ब्रोस – २१.० सरासरी