संग्रहित छायाचित्र
बॉर्डर-गावस्कर क्रिकेट मालिकेतील (Border–Gavaskar Trophy) चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला. मेलबर्नच्या मैदानावर हा सामना खेळला गेला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २ -१ अशी आघाडी घेतली आहे. हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता असतानाच कमजोर फलंदाजीमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. (Cricket News)
मेलबर्नवर (Melbourne Test) खेळल्या गेलल्या या सामन्यात भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ १५५ धावांतच आटोपला. भारताचे ७ फलंदाज तासाभरात एका पाठोपाठ पव्हेलियनमध्ये परतले.
पाच सामन्यांच्या या मालिकेत अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी मालिकेत भारतीय संघाला खेळायचे असेल तर कोणत्याही परिस्थित भारताला पुढील सामना जिंकावा लागणार आहे.
यशस्वी जैस्वाल चुकीच्या निर्णयाचा बळी?
मेलबर्न कसोटीत ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी असमाधानकारक राहिली. यादरम्यान यशस्वी जैस्वाल हा मैदानात टिकून होता. ८२ धावांवर खेळत असताना त्याला आउट देण्यात आले. मात्र त्याला आउट देण्याचा निर्णय वादग्रस्त मानला जात आहे. तिसऱ्या पंचांनी यशस्वी जैस्वालला आउट दिले. स्निकोमिटरवर कोणतीही हालचाल नसताना यशस्वी जैस्वालला आउट देण्यात आले. जैस्वालने २०८ चेंडूत ८४ धावा केल्या. पॅट कमिन्स लेग साइडवर शॉर्ट बॉल टाकला. हा बॉल तिसऱ्या पंचाच्या मते त्याच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. मैदानावरील पंचांनी जैस्वालला आउट दिले नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी स्निकोमिटरवर कोणतीही हालचाल नसताना जैस्वालला आउट दिले.