भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर ठाण्यातील आकृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांबळी याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर कांबळी यांची विचारपूस करण्यासाठी मंत्रीमहोदयांचा ओघ रुग्णालयात सुरु झाला आहे. नुकतचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी कांबळी यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मुलासह म्हणजे खासदार श्रीकांत शिंदेंसह कांबळींची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कांबळी यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, सरनाईक यांनी रुग्णालयात जात विनोद कांबळी यांची विचारपूस केली तसेच ख्रिसमसच्या शुभेच्छादेखील दिल्या. यावेळी, वानर सेना या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. तसेच, श्रीकांत शिंदे यांनीदेखील श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने 5 लाख मदत जाहीर केली आहे. ही सर्व रक्कम कांबळीच्या पत्नीच्या खात्यात जमा होईल. असेही सांगण्यात आलं आहे.
मैदानावर तू अनेक सेंच्युरी, डबल सेंच्युरी मारल्या आहेत. आता, तुला आयुष्याची सेंच्युरी मारायची आहे, अनेक क्रिकेटर्स घडवायचे आहेत असे प्रताप सरनाईक यांनी अशा शब्दात कांबळी आणि त्याच्या परिवाराला धीर दिला. विनोदच्या लग्नाची आठवण सांगताना तो माझा मित्र आहे. यापुढील त्याच्या सर्वच उपचाराची जबाबदारी आम्ही सर्वजण घेत असल्याचंही सरनाईक यांनी म्हटले आहे.
भारतीय फलंदाजाने सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना शनिवारी भिवंडी शहरातील काल्हेर परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर कांबळी याला नेमकं काय झालं आहे हे उघड झालं. काही दिवसांपूर्वी, कांबळीची प्रकृती पाहून टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी विनोद कांबळी यांनी कपिल देव यांची ऑफर स्वीकारली होती. याशिवाय या दिग्गजांनी दिलेल्या मदतीबद्दलही कांबनीने कृतज्ञता व्यक्त केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.