संग्रहित छायाचित्र
मेलबर्न : दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी ट्रॅव्हिस हेडला वर्तमान क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असे म्हटले आहे. भारताचा गुणवान वेगवान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची लय त्याने बिघडवली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बाॅर्डर-गावसकर कसोटी मालिकेत वर्चस्व मिळवू शकला, असा दावादेखील त्यांनी केला.
चॅपेल म्हणाले,‘‘बीजीटीमध्ये जसप्रीत बुमराहविरुद्ध हेडची कामगिरी हे त्याच्या निडर दृष्टिकोनाचे आणि फलंदाजीच्या ऑस्ट्रेलियन सूत्राचे उदाहरण आहे.’’ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार चॅपेल असे मानतात की हेडच्या कसोटी फलंदाजाच्या यशामागील त्याची उत्स्फूर्तता आणि आक्रमकता आहे. हेडने भारताविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत दोन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ४०९ धावा केल्या आहेत. तो या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’मधील आपल्या स्तंभात चॅपेल लिहितात, ‘‘सध्या हेडची बुमराहविरुद्धची कामगिरी हे त्याच्या निडर दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. इतर फलंदाज बुमराहच्या अपारंपरिक कृती, वेगवान आणि सातत्यपूर्ण अचूक गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करत असताना हेडने मात्र त्याचा सहजपणे सामना केला. हेडने बुमराहचा भक्कम इराद्याने सामना केला आणि त्याच्याविरुद्ध धावा करण्याचा प्रयत्न करून त्याचा धोका कमी केला नाही तर त्याची लयही बिघडवली. शॉर्ट पिच चेंडू खेळण्याची तसेच फुल लेन्थ चेंडूवर फटकेबाजी करण्याची त्याची क्षमता विशेष आहे, यावरून हेडची प्रगती दिसून येते.’’
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी सिरीजमधील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (दि. २६) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर सुरू होत आहे. सध्या पाच कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळलेला तिसरा सामना अनिर्णित राहिला. ॲडलेड येथे झालेली दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने जिंकली. त्याआधी पर्थ कसोटीत भारताने २९५ धावांनी विजय मिळवला होता.
साध्या शैलीतून गाठले यशाचे शिखर
कच्च्या, अनपेक्षित प्रतिभेपासून ते जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली पुरुष फलंदाजांपैकी एक, ट्रॅव्हिस हेडने शिखर गाठले आहे. त्याचा प्रवास केवळ आव्हानांवर मात करण्यापुरता मर्यादित नाही तर त्याची ओळख बनलेल्या त्याच्या शैलीतील साधेपणा जपण्याचाही आहे, अशा शब्दांत हेडचे कौतुक करून चॅपेल म्हणाले, ‘‘तो जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे. तो सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध आपली रणनीती ठरवू शकतो. हेडच्या फलंदाजीचे सार त्याच्या सुव्यवस्थित मनात आहे. सावधगिरीपेक्षा हेतूला प्राधान्य देणारा मार्ग त्याने निवडला आहे. प्रत्येक चेंडूचा धावा करण्याच्या उद्देशाने सामना करण्याची प्रेरणा देणारी मानसिकता त्याला स्पेशल फलंदाज बनवते.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.