संग्रहित छायाचित्र
भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने रविवारी (दि. २९) इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हम्पीने यापूर्वी २०१९ मध्ये जॉर्जियामध्ये ही स्पर्धा जिंकली होती. भारताची ही नंबर वन महिला बुद्धिबळपटू चीनच्या झू वेनजुननंतर हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू आहे.
३७ वर्षीय हम्पीने ११ पैकी ८.५ गुणांसह स्पर्धा पूर्ण केली. भारतीय ग्रँडमास्टरसाठी हा निर्णायक विजय होता. चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी त्यांना फक्त विजयाची गरज होती. ड्रॉ किंवा पराभवाने त्यांचे स्वप्न भंगले असते. मात्र, तसे झाले नाही. रशियाच्या १८ वर्षीय वोलोदार मुर्झिनने पुरुष गटात विजेतेपद पटकावले. नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह नंतर मुर्झिन हा दुसरा सर्वात तरुण फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन आहे. नोदिरबेकने वयाच्या १७ व्या वर्षी विजेतेपद पटकावले.
हम्पीचा वर्षाचा शेवट मोठ्या उत्साहात झाला आहे. या विजयासह हम्पीने भारतीय बुद्धिबळासाठी वर्षाचा शेवट केला. तिची ही कामगिरी विशेष होती. अलीकडेच सिंगापूर येथे झालेल्या शास्त्रीय बुद्धिबळ जागतिक स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून डी गुकेश चॅम्पियन बनला. हम्पीने नेहमीच वेगवान जगात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत तिने २०१२ च्या आवृत्तीत कांस्यपदक जिंकले होते.
Congratulations to @humpy_koneru on winning the 2024 FIDE Women’s World Rapid Championship! Her grit and brilliance continues to inspire millions.
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2024
This victory is even more historic because it is her second world rapid championship title, thereby making her the only Indian to… https://t.co/MVxUcZimCc pic.twitter.com/nndIak2OvI
२०१९ मध्ये जॉर्जियातील बटुमी येथे चॅम्पियनशिप जिंकून हम्पीने यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यानंतर तिने चीनच्या लेई टिंगजीला नव्हॅकिंग आर्मागेडॉन गेममध्ये पराभूत केले, तर गेल्या वर्षी (२०२३) तिने समरकंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या याच स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. २०२३ मध्ये रशियाच्या अनास्तासिया बोडनारुकविरुद्ध टायब्रेकमध्ये तिला विजेतेपद हुकले होते. हम्पी महिला बुद्धिबळातील देशातील अव्वल खेळाडू असून हम्पीने इतर फॉरमॅटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने २०२२ ला महिला जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. वैयक्तिक कारणांमुळे हम्पी बुडापेस्ट ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होऊ शकली नाही, जिथे भारताने सहा सुवर्णपदके जिंकली होती. यामध्ये वैयक्तिक स्पर्धेतील सुवर्ण आणि भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या सुवर्णपदकांचा समावेश आहे. हम्पी त्या महिला संघाचा भाग नव्हती, परंतु तिने २०२४ च्या शेवटी जलद विजेतेपद जिंकून नेत्रदीपक पुनरागमन केले.