File Photo
मुंबई : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्मध्ये असून त्याची बॅट मैदानावर आग ओकताना दिसत आहे. त्याने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात शतक झळकावत विक्रमांची रांग लावली आहे. डरबनच्या किंग्समीड मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने १०७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. ज्याच्या जोरावर भारताने ६१ धावांनी विजय मिळवला. यादरम्यान संजू सॅमसने आपल्या विस्फोटक खेळीने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला.
संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात केवळ १०७ धावांची इनिंग खेळली नाही, तर टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावाही पूर्ण केल्या. संजूने त्याच्या २६९ व्या टी-२० डावात हा आकडा गाठला आहे. यासह तो जलद ७००० धावा पूर्ण करणारा भारताचा संयुक्त सातवा खेळाडू ठरला आहे.
संजूने या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक यांना मागे टाकले आहे. धोनीने ३०५ डावात ७००० टी-२० धावा पूर्ण केल्या होत्या. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ७००० धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम सध्या पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे, ज्याने केवळ १८७ डावांमध्ये हा आकडा गाठला. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेलचे नाव येते, ज्याने १९२ डावांमध्ये ७००० टी-२० धावा पूर्ण करण्यात यश मिळवले.