राजस्थानचा राॅयल विजय!

विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत उतरलेल्या राजस्थान राॅयल्स संघाने विजयी प्रारंभ करताना रविवारी (दि. २) सनरायझर्स हैदराबाद संघाला ७२ धावांनी पाणी पाजले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:51 am
राजस्थानचा राॅयल विजय!

राजस्थानचा राॅयल विजय!

हैदराबादवर ७२ धावांनी मात; बटलर, कर्णधार सॅमसन, यशस्वी यांची अर्धशतके, चहलचे ४ बळी

#हैदराबाद

विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत उतरलेल्या राजस्थान राॅयल्स संघाने विजयी प्रारंभ करताना रविवारी (दि. २) सनरायझर्स हैदराबाद संघाला ७२ धावांनी पाणी पाजले.

कर्णधार संजू सॅमसनसह, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी हैदराबादची गोलंदाजी फोडून काढताना आक्रमक अर्धशतके झळकावली. या जोरावर राजस्थानने ५ बाद २०३ अशी मजबूत धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, स्मार्ट फिरकीपटू युझवेंद्र चहलने ४ बळी घेत हैदराबादला २० षटकांत ८ बाद १३१ धावांवर रोखले. हैदराबादने धावांचे खाते उघडण्यापूर्वीच अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात दोन बळी घेतले. प्रारंभीच्या या धक्क्यानंतर धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ विजयाच्या मार्गावर अजिबातही दिसला नाही.  या संघातर्फे अब्दुल समदने सर्वाधिक नाबाद ३२ धावा केल्या. जेसन होल्डर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद करीत चहल आणि बोल्टला चांगली साथ दिली. ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूंत ५४ धावांची वादळी खेळी करणारा बटलर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

 हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वरकुमारने घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण राजस्थानच्या फलंदाजांनी तो चुकीचा ठरवला. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी अवघ्या ५.५ षटकांत ८५ धावांची अविश्वसनीय सलामी दिली. या दरम्यान बटलर अधिक आक्रमक होता. त्याने  २४५.४५ च्या स्ट्राईक रेटने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. अखेर फझलहक फारुकीने अप्रतिम चेंडूवर बटरलचा त्रिफळा उडवून आपल्या संघाला जरा दिलासा दिला, पण हा आनंद क्षणिक ठरला. जयस्वालच्या साथीला आलेल्या सॅमसनने कर्णधाराला साजेशा शैलीत फटकेबाजी करताना ३२ चेंडूंत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५५ धावा चोपल्या.

संजू-यशस्वी जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ६.३ षटकांत ५४ धावांची भागिदारी केली. फारुकीनेच ३७ चेंडूंत ९ चौकारांसह ५४ धावा करणाऱ्या यशस्वीला बाद करीत ही जोडी फोडली. अखेरच्या षटकांत शिमराॅन हेटमयारने (नाबाद २२) राजस्थानला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. हैदराबादतर्फे फारुकी आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

ज्या खेळपट्टीवर राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला, त्याच खेळपट्टीवर हैदराबादचे फलंदाज मात्र धावांसाठी झगडताना दिसले. विजयासाठी २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादने खाते उघडण्यापूर्वीच बोल्टने पहिल्या षटकात दोन धक्क दिले.  त्याने अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना तंबूत पाठवत सामन्याचा निकाल निश्चित केला. एक वेळ हैदराबाद संघाची अवस्था ७ बाद ८१ अशी होती. उमरान मलिक आणि अब्दुल समद यांच्या फलंदाजीमुळे या संघाने सव्वाशेचा टप्पा ओलांडला. या दोघांनी आठव्या गड्यासाठी केलेली नाबाद ३६ धावांची भागिदारी हैदराबादच्या डावात सर्वोच्च ठरली.

समदने सर्वाधिक नाबाद ३२ (३२ चेंडूंत १ षटकार, २ चौकार) धावांची खेळी केली. उमरान ८ चेंडूंत २ षटकार आणि एका चौकारासह १९ धावांवर नाबाद राहिला.

 मयांक अग्रवाल (२७) , हॅरी ब्रूक (१३), वॉशिंगटन सुंदर (१), ग्लेन फिलिप्स (८) हे स्टार फलंदाज अपयशी ठरले. वृत्तसंस्था

संक्षिप्त धावफलक :

राजस्थान राॅयल्स : २० षटकांत ५ बाद २०३ (संजू सॅमसन ५५, जोस बटलर ५४, यशस्वी जयस्वाल ५४, शिमराॅन हेटमायर नाबाद २२, टी. नटराजन २/२३, फझलहक फारुकी २/४१, उमरान मलिक १/२२) विवि सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १३१ (अब्दुल समद नाबाद ३२, मयांक अगरवाल २७, उमरान मलिक नाबाद १९, आदिल रशीद १८, युझवेंद्र चहल ४/१७, ट्रेंट बोल्ट २/२१, जेसन होल्डर १/१६, रवीचंद्रन अश्विन १/२७).

सामनावीर : जोस बटलर.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest