दक्षिण आफ्रिकेला आयर्लंडचा दणका

आयर्लंडचा संघाने सोमवारी (दि. ७) रात्री उशिरा झालेल्या एकदिवसीय सामन्यात शानदार निकालाची नोंद करताना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा ६९ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ५० षटकांत ९ बाद २८४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४६.१ षटकांत २१५ धावांवर गारद झाला. आयर्लंडतर्फे ग्रॅहम ह्यूम आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी तीन तर मार्क एडेअर यांनी दोन विकेट घेतल्या.

 South Africa, ODI,Ireland ,challenging ,Ireland ,team ,challenging score

मार्क एडेअरने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला

एकदिवसीय सामन्यात उडवला ६९ धावांनी धुव्वा, आफ्रिकेवर दुसऱ्यांदा मात, कर्णधार पाॅल स्टर्लिंग ठरला विजयाचा शिल्पकार

अबुधाबी : आयर्लंडचा संघाने सोमवारी (दि. ७) रात्री उशिरा झालेल्या एकदिवसीय सामन्यात शानदार निकालाची नोंद करताना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा ६९ धावांनी धुव्वा उडवला.प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ५० षटकांत ९ बाद २८४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४६.१ षटकांत २१५ धावांवर गारद झाला.

आयर्लंडतर्फे ग्रॅहम ह्यूम आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी तीन तर मार्क एडेअर यांनी दोन विकेट घेतल्या. ९२ चेंडूंत ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ८८ धावा करीत आयर्लंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देणारा कर्णधार पाॅल स्टर्लिंग ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. या पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचे आफ्रिकेचे स्वप्न भंगले. तीन सामन्यांची ही मालिका या संघाने २-१ अशी जिंकली. मालिका गमावली असली तरी शेवट गोड केल्याचा आनंद आयर्लंड संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता. वनडेच्या इतिहासात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडला सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँडी बालबर्नी यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १४० चेंडूत १०१ धावा केल्या. फिरकीपटू ट्रिस्टन स्टब्सने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. त्याने सलामीवीर अँडी बालबर्नीला २४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लिझाड विल्यम्सकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बलबर्नीने ७३ चेंडूंत १ षटकार आणि ४ चौकारांसह ४५ धावा केल्या.

बलबर्नी बाद झाल्यानंतर कर्णधार स्टर्लिंगने कर्टिस कॅम्फरसोबत अर्धशतकी भागिदारी करीत संघाला दीडशेपार नेले. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ५८ धावांची भागीदारी झाली. कॅम्परने ३६ चेंडूत ३४ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार लगावले. ३४ वर्षीय स्टर्लिंग एकदिवसीय कारकिर्दीतील १४वे शतक झळकावणार, ,असे वाटत असतानाच ओटनील बार्टमनने त्याला क्लीन बोल्ड केले.

कर्णधार स्टर्लिंग बाद झाल्यानंतर हॅरी टेक्टरने आयर्लंडच्या डावाची जबाबदारी घेतली. त्याने वेगवान फलंदाजी करत संघाला पावणेतीनशेपार नेले.  त्याने ४८ चेंडूंत६० धावांच्या खेळीत १ षटकार आणि ४ चौकार मारले. यष्टीरक्षक-फलंदाज लॉर्कन टकरसोबत (२६) चौथ्या विकेटसाठी ५० चेंडूत ५४ धावांची उपयोगी भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लिझाड विल्यम्सने ५६ धावा देत ४ बळी घेतले. ओटनील बार्टमन आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

 वजयासाठी २८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेचे फलंदाज प्रारंभीपासून नियमित अंतराने बाद होत गेले. या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या १० धावांत त्यांनी तीन अव्वल फलंदाज गमावले होते.  मार्क एडेअरला पहिल्याच षटकात आयर्लंडला पहिले यश मिळाले, त्याने पाचव्या चेंडूवर रायन रिकेल्टनला (४) बाद केले. चौथ्या षटकांत ग्रॅहम ह्यूमने रीझा हेन्ड्रिक्सला (१) अँडी बालबिर्नीमार्फत झेलबाद करून संघाला दुसरे यश मिळवून दिले. एडेअरने रॅसी व्हॅन डर ड्युसेनला (३) एलबीडब्ल्यू बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले.

त्यानंतर काईल व्हेरीनने दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळला आणि ट्रिस्टन स्टब्ससोबत चौथ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ४९ धावांची भागीदारी केली. संघ ८० धावांवर पोहोचेपर्यंत हे दोघेही बाद झाले. त्यानंतर जेसन स्मिथने आश्वासक फलंदाजी करत आफ्रिकेच्या आया जागवल्या होत्या.  त्याने ९३ चेंडूंचा सामना करत ९१धावा केल्या. यात ४ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ लाभली नाही.

फलंदाजी प्रशिक्षकाने केले क्षेत्ररक्षण

या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनीला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागले.माजी आफ्रिकन क्रिकेटपटू आणि सध्या या संघाच्या मर्यादित फाॅरमॅटमधील फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनी आयर्लंडच्या डावाच्या शेवटच्या षटकात मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसला.

४० वर्षीय ड्युमिनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत नऊ हजाराहून अधिक धावा आणि १३० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. या मालिकेत आफ्रिकेच्या संघाचे अनेक खेळाडू जखमी झाले. त्यामुळे ड्युमिनीला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यावे लागले. टेंबा बावुमा कोपरच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला. दुसरीकडे, विआन मुल्डर वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला होता.

त्याच्याशिवाय संघाचा सलामीवीर टोनी डी जोर्जी हादेखील सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यानंतर टोनी मैदानात दिसला नाही.आयर्लंडच्या डावाच्या शेवटच्या षटकात जेपी ड्युमिनीने स्पायडरमॅनप्रमाणे उडी मारत चेंडू रोखला. त्याच्या फिल्डिंगच्या व्हीडीओ क्लिपचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. गेल्याच वर्षी ड्युमिनीची दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित फाॅरमॅटमधील फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest