File Photo
भारताचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि सलामी फलंदाज शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार आहेत. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली. शुबमनची मान दुखावल्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता.भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी सांगितले की, ‘‘ऋषभ फिट आहे. त्याला गुडघ्याच्या हालचालीचा थोडा त्रास होत होता, मात्र तो पुणे कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे.
बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतला गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याने मैदान सोडले. यानंतर ध्रुव जुरेलने किपिंग केले. दुखापत झाल्यानंतर पंत खेळू शकला नसला तरी तो भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने ९९ धावांची इनिंग खेळली होती. कार अपघातानंतर ज्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्याच गुडघ्याला दुखापत झाली होती.
शुबमन पहिल्या कसोटीत खेळला नाही. त्याच्या फिटनेसवर डोशेट म्हणाले, शुबमनने गेल्या आठवड्यात बंगळुरूमध्ये नेटमध्ये फलंदाजी केली. त्याला थोडा त्रास होत आहे, पणतो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल.