File Photo
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गरुवारपासून (दि. २४) गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघव्यवस्थापनाने पुन्हा एकदा फिरकीच्या त्रिकुटावर भरवसा दाखवला आहे.
बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याच्या निर्णयाला सर्वाधिक जबाबदार ठरवले गेले. हा पराभव विसरून मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने भारतीय संघ गहुंजेच्या मैदानावर उतरणार आहे. पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे तिघे फिरकीपटू खेळले होते. दुसऱ्या कसोटीतीही तीन फिरकीपटूंचे खेळणे निश्चित आहे. मात्र, पहिल्या कसोटीत खेळलेल्या तिघांपैकी एका नावात बदल होऊ शकतो.
दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघाचे संयोजन पहिल्या सामन्याप्रमाणेच राहू शकते, परंतु यावेळी काही नावे बदलू शकतात. त्यानंतर संघ पाच फलंदाज, एक यष्टीरक्षक, तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल. मात्र, अंतिम संघ निवडण्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाला काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणाला संधी द्यावी, हा प्रश्न संघव्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. शुबमन दुखापतीमुळे पहिली कसोटी खेळू शकला नाही. आता तो तंदुरुस्त आहे. राहुल पहिल्या कसोटीत नापास झाला होता.
शुबमन बंगळुरू कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळणार होता. पण सामन्यापूर्वी त्याला दुखापत झाली. त्याच्याऐवजी सर्फराझ खानला संधी मिळाली. त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेत शानदार दीडशतक झळकावले. यामुळे आता सर्फराझला बाहेर ठेवणे संघ व्यवस्थापनासाठी खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत शुबमन किंवा राहुल यांच्यापैकी एकालाच अंतिम संघात स्थान मिळणे शक्य आहे.
बुमराहसोबत मोहम्मद सिराज की आकाशदीप, याचाही फैसला संघव्यवस्थापनाला करावा लागणार आहे. सिराज लयीत नाही. आकाशदीप नव्या चेंडूवर विकेट घेत आहे. फलंदाजीही करू शकतो. सिराजने या वर्षात घरच्या मैदानात सात कसोटी सामने खेळले असून त्याने ४२.८३च्या सरासरीने केवळ १२ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने सात सामन्यात ३३ विकेट घेतल्या आहेत. आकाश दीपने भारतासाठी आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २३.१२ च्या सरासरीने ८ बळी घेतले आहेत. आकाश दीपची फलंदाजीही सिराजपेक्षा मजबूत आहे.
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यांना वगळता येणार नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलला बाहेर बसवण्याचा पर्याय आहे. पण व्यवस्थापन यासाठी तयार नाही. राहुलला आणखी एक संधी दिल्यास शुबमनला यावेळीही बेंचवर बसावे लागेल.
फलंदाजीत आणखी खोली आणण्यासाठी संघ तीन अष्टपैलू खेळाडूंना संधी देऊ शकतो. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताची संपूर्ण फलंदाजी कोलमडली. दुसऱ्या डावात टॉप ऑर्डर आणि मधल्या फळीने चांगला खेळ केला, पण खालच्या फळीला कोणतीही झुंज देता आली नाही. दुसऱ्या डावात एकवेळ भारताने ३ बाद ४०८ धावा केल्या होत्या, पण शेवटच्या ६ विकेट ५४ धावांत पडल्या. हेही भारताच्या पराभवाचे एक कारण ठरले. यावेळी अशी परिस्थिती टाळण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवच्या जागी अक्षर पटेल किंवा वाॅशिंग्टन सुंदरला संधी देऊ शकतो.
त्रिकूट नक्की कोणते?
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासह तिसरा फिरकीपटू कोण, याचे उत्तर अंतकम संघ नित्तडण्यापूर्वी मिळणे अतिशय अवघड आहे. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि नव्यानेच संघात समावेश करण्यात आलेला वाॅशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणाला तिसरा स्पिनर म्हणून संधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या कसोटीत कुलदीपला विशेष काही करता आले नाही.
अक्षरचा समावेश झाला तर फलंदाजी मजबूत होईल. वाॅशिंग्टन सुंदरही गोलंदाजीसोबतच फलंदाजीतदेखील योगदान देऊ शकतो. त्यामुळे अश्विन-जडेजासोबत तिसरा कोण, याचा निर्णय घेणे संघव्यवस्थापनाला जड जाणार आहे. एखाद्या वेळी जडेजाला वगळून अश्विनसोबत कुलदीप, अक्षर आणि वाॅशिंग्टन सुंदर यांच्यापैकी दोघांना संधी दिली जाऊ शकते.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराझ खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वाॅशिंग्टन सुंदर.