IPL : चेन्नईविरुद्ध पंजाब सिकंदर!

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रविवारी (३० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. चेन्नईने ४ बाद २०० धावा केल्यानंतर सिकंदर रझाने २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ३ धावा घेतल्या आणि ६ बाद २०१ धावा करीत पंजाबने थरारक विजय नोंदवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 01:56 pm
चेन्नईविरुद्ध पंजाब सिकंदर!

चेन्नईविरुद्ध पंजाब सिकंदर!

# चेन्नई

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रविवारी (३० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. चेन्नईने ४ बाद २०० धावा केल्यानंतर सिकंदर रझाने २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ३ धावा घेतल्या आणि ६ बाद २०१ धावा करीत पंजाबने थरारक विजय नोंदवला.  

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ४ बाद २०० अशी भक्कम धावसंख्या उभारली. यात सलामीवीर डेव्हन काॅनवेने सर्वाधिक ९२ धावांचे योगदान दिले. पुणेकर फलंदाज ऋतुराज गायकवाडनेही ३७ धावांची उपयोगी खेळी केली. पंजाबतर्फे सिकंदर रझा, राहुल चहर, अर्शदीपसिंग आणि सॅम करन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. चेन्नईतर्फे तुषार देशपांडे (३/४९), रवींद्र जडेजा (२/३२) आणि मथिशा पथिराणा (१/३२) यांनी टिच्चून मारा करूनदेखील ते पंजाबला विजयापासून रोखू शकले नाहीत. पंजाबतर्फे कोणीही मोठी खेळी केली नसली तरी प्रभसिमरन सिंग (४२), लियाम लिव्हिंगस्टोन (४०), सॅम करन (२९), कर्णधार शिखर धवन (२८), जितेश शर्मा (२१) आणि सिकंदर रझा (नाबाद १३) यांनी उपयोगी योगदान देत संघाची नौका विजयापार नेली. पंजाबने ४ गडी राखून अखेरच्या चेंडूवर हा सामना जिंकला.  

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा हा पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज असताना मथिषा पथिराणाने टिच्चून गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना बांधून ठेवले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची आवश्यकता असताना सिकंदरने डीप मिडविकेट आणि डीप फाईन लेगच्या गॅपमध्ये चेंडू टोलवला. तो चेंडू सीमारेषेवर पोहोचण्याआधीच फिल्डरने थांबवला. मात्र इकडे सिकंदर आणि शाहरुख खान (नाबाद २) यांनी जिवाच्या आकांताने धावत तीन धावा पूर्ण केल्या आणि पंजाबला थरारक विजय मिळवून दिला.

पंजाबकडून प्रभसिमरन सिंहने २४ चेंडूंत २ षटकार आणि ४ चौकारांसह सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने ४० (२४ चेंडूंत ४ षटकार, १ चौकार), सॅम करनने २९ (२० चेंडूंत १ षटकार, १ चौकार), शिखर धवनने २८ (१५ चेंडूंत १ षटकार, ४ चौकार), जितेश शर्माने २१ (१० चेंडूंत १ षटकार, २ चौकार) तर अथर्व तायडे आणि सिकंदर रझाने प्रत्येकी १३  धावा (७ चेंडूंत १ चौकार) केल्या.  

तत्पूर्वी, डेव्हन-ऋतुराज जोडीने चेन्नईला ९.४ षटकांत ८६ धावांची सलामी दिली. ऋतुराजने ३१ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांसह ३७ धावा केल्या. डेव्हनने ५२ चेंडूत नाबाद ९२ धावा फटकावताना १ षटकार आणि १६ देखणे चौकार लगावले. दहाव्या षटकात सिकंदर रझाने ऋतुराजला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर दुबे आणि कॉनवेने दुसऱ्या गड्यासाठी ४४ धावांची भागिदारी करत डाव पुढे नेला. अर्शदीपने चौदाव्या षटकात दुबेला २८ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. अखेरच्या षटकात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ४ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद १३ धावा करीत चेन्नईला दोनशेचा आकडा गाठून दिला.

चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद २०० (डेव्हन काॅनवे नाबाद ९२, ऋतुराज गायकवाड ३७, शिवम दुबे २८, सिकंदर रझा १/३१, राहुल चहर १/३५, अर्शदीपसिंग १/३७, सॅम करन १/४६) पराभूत वि. पंजाब किंग्ज : २० षटकांत ६ बाद २०१ (प्रभसिमरन सिंग ४२, लियाम लिव्हिंगस्टोन ४०, सॅम करन २९, शिखर धवन २८, जितेश शर्मा २१, सिकंदर रझा नाबाद १३, तुषार देशपांडे ३/४९, रवींद्र जडेजा २/३२, मथिशा पथिराणा १/३२).

सामनावीर : डेव्हन काॅनवे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest