संग्रहित छायाचित्र
पुणे : 'पुनीत बालन ग्रुप'चा खेळाडू असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा शेख हा महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला असून त्याच्या या विजयाबद्दल 'पुनीत बालन ग्रुप'कडून अभिनंदन करण्यात आले आहे.
गतवर्षी म्हणजे २०२३ ला सिकंदर शेख याने 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती जिंकून ६६ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला होता. त्याच्या कुस्तीमधील पुढील करिअरसाठी पुण्यातील 'पुनीत बालन ग्रुप'ने सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 'पुनीत बालन ग्रुप' आणि सिकंदर शेख यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या मदतीच्या आधारे शेख याची विविध कुस्ती स्पर्धांत भाग घेण्याची आणि त्यात विजय मिळविण्याची घौडदौड जोमाने सुरू असून त्यात आणखी एका मोलाच्या विजयाची भर पडली आहे.
पंजाब मधील जांडला, जि. जालंधर येथे २०२४ च्या रुस्तुम-ए-हिंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांना धुळ चारत सिकंदर शेख याने रुस्तुम-ए-हिंद हा किताब पटकविला. या रुस्तुम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यात केवळ पै. हरीशचंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद यांनीच हा किताब जिंकल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतर आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे. या स्पर्धेत सिकंदर च्या रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्यासोबत झालेल्या कुस्त्या रोमहर्षक आणि पाहण्यासारख्या होत्या. अंतिम स्पर्धेत सिकंदर विरूध्द बग्गा कोहली यांच्यात कुस्ती झाली यात सिकंदर विजयी झाला. त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा, ट्रॅक्टर या बक्षिसाबरोबरच आर्थिक स्वरूपातही बक्षिस मिळाले आहे.
"सिंकंदर शेख हा एक गुणवान खेळाडू आहे. त्याने रुस्तम-ए-हिंद किताब जिंकून आपल्या महाराष्ट्राचं नाव देशपातळीवर गाजवलं. भविष्यात शेख कुस्तीच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव तो उंचावेल अशी खात्री आहे. 'पुनीत बालन ग्रुप'कडे असे गुणवंत खेळाडू आहेत, ही आमच्यासाठी आणखी आंनदाची आणि अभिमानाची बाब आहे. शेख याने मिळविलेल्या यशामुळे आणखी प्रतिभावान खेळाडूंच्या मागे उभं राहण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली."
- पुनीत बालन , अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप