संग्रहित छायाचित्र
दुबई : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या आउटफिल्डला आयसीसीने खराब रेटिंग दिले आहे. एवढेच नाही तर स्टेडियमच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा झाला आहे. यामुळे बीसीसीआयला टाका सहन करावी लागत आहे.
ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. यात भारतीय संघाने अवघ्या अडीच दिवसांच्या खेळात ७ गडी राखून बाजी मारली. सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचाच खेळ झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही षटक टाकले गेले नाही. विशेष म्हणजे, तिसऱ्या दिवशी पाऊस झाला नव्हता. तरीदेखील खेळहोऊ शकला नाही. कारण आउटफिल्ट वाईट अवस्थेत होते. नेमक्या याच मुद्द्यावर आयसीसीने बोट ठेवत डिमेरिट पॉईंट ठोठावला. ग्रीन पार्कच्या खेळपट्टीला मात्र आयसीसीने समाधानकारक ठरवले आहे.
सुमारे अडीच दिवसांचा खेळ पावसाने वाहून गेला असतानाही, भारताने १२१.२ षटकात बांगलादेशच्या दोन डांवत मिळून सर्व २० विकेट्स घेतल्या आणि ५२ षटकांत ७.३६ च्या धावगतीने ३८३ धावा करून विजय मिळवला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये पाऊस पडला. या दिवशी केवळ ३५ षटके टाकता आली. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळही होऊ शकला नाही. २९ सप्टेंबर रोजी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कानपूरमध्ये पाऊस नव्हता, पण मैदान ओले असल्याने खेळ होऊ शकला नाही.
या सामन्यादरम्यान कानपूरच्या स्टेडियमवर बरीच टीका झाली होती. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (शुक्ला स्वतः कानपूरचे आहेत) मदतीला आले, त्यांनीही स्टेडियमच्या नूतनीकरणाची गरज असल्याचे सांगितले.
या सामन्यापूर्वी पीडब्ल्यूडी विभागाने ग्रीन पार्कचे स्टँड असुरक्षित घोषित केले होते, त्यासोबतच प्रेक्षकांसाठी मर्यादित संख्येने वरच्या स्तरावरील जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विभागाने अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या स्टेडियमची मालकी उत्तर प्रदेश सरकारकडे आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन राज्य सरकारसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार स्टेडियमचा वापर करते. स्टेडियम आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनची आहे.
चेपॉक खूप चांगले; पुणे, बंगळुरु, मुंबई बरे
आयसीसीने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमला 'खूप चांगले' रेटिंग दिले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करणाऱ्या मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथील खेळपट्ट्यांना 'समाधानकारक' रेटिंग मिळाले आहे.
आयसीसी चार पॅरामीटर्सवर खेळपट्टीचे मूल्यांकन करते कोणताही सामना किंवा स्पर्धेनंतर, आयसीसी मॅच रेफरीच्या पुनरावलोकनाच्या आधारे संबंधित ठिकाणाचे रेट करते. हे रेटिंग चार स्केलवर केले जाते. खूप चांगले, समाधानकारक, असमाधानकारक आणि अयोग्य. असमाधानकारक रेटिंगचा परिणाम स्थळाच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडला जातो, तर अयोग्य रेटिंगचा परिणाम तीन डिमेरिट पॉइंट्समध्ये होतो.
जर एखाद्या मैदानाला पाच वर्षांच्या कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळाले तर त्या मैदानावर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.