संग्रहित छायाचित्र
मुंबई: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने आपल्या तुफानी फलंदाजीने धुमाकूळ घातला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात फिल सॉल्टने १९०.७४ च्या स्ट्राईक रेटने ५४ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली. या डावात सॉल्टने ९ चौकार आणि ६ षटकार मारले. अशा प्रकारे सॉल्टने केवळ चौकार षटकारांच्या मदतीने १५ चेंडूत ७२ धावा केल्या. फिल सॉल्टच्या या दमदार खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकला.
फिल सॉल्टचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे शतक होते आणि तिन्ही शतके फिल सॉल्टने वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली होती. अशा स्थितीत फिल सॉल्टने पुन्हा एकदा कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई केली. विशेष म्हणजे, हा तोच फिल सॉल्ट आहे ज्याला केकेआर संघाने आयपीएल २०२५ साठी रिटेन केले नाही. या सामन्यात फिल सॉल्टशिवाय जेकब बेथॉलनेही ३६ चेंडूत ५८ धावांची स्फोटक खेळी खेळून इंग्लंडला सहज विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, या शतकाच्या बळावर फिल सॉल्टने टी-२० मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमात संजू सॅमसनला मागे टाकले. सॅमसनने दोन शतके झळकावली आहेत. तर, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्माच्या नावावर ५ टी-२० शतके आहेत, तर सूर्यकुमार यादवने ४ शतके झळकावली आहेत.
इंग्लंडसमोर वेस्ट इंडिजसमोर १८३ धावांचे लक्ष्य होते. या सामन्यात यजमान संघाने निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ३८ धावांची खेळी खेळली. याशिवाय रोमारियो शेफर्डने ३५ धावांची नाबाद खेळी तर आंद्रे रसेलने ३० धावांची खेळी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर साकिब महमूदने ४, तर आदिल रशीदने ३ बळी घेतले. गोलंदाजांनी इंग्लंडला अवघ्या १८२ धावांत रोखल्यानंतर फिल सॉल्ट आणि जेकब बेथेल यांच्या झंझावाती खेळीमुळे इंग्लंडने १६.५ षटकांत लक्ष्य गाठले. अशाप्रकारे या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.