संग्रहित छायाचित्र
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट ही अपात्र ठरली आहे. तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. परिणामी तिला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे करोडो भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला धीर
यासर्व प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत विनेशला धीर दिला. पंतप्रधान म्हणाले, विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुझं अपात्र ठरवलं जाणं हे वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला जे दुख: होतं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे बोलताना, आव्हान स्वीकारणं हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत
वजन कमी करण्यासाठी विनेशने काढलं स्वत:च रक्त
विनेश फोगाट हिला डिहायड्रेशनमुळे चक्कर आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेल्याची बातमी समोर आली. मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते आणि ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती. त्यामुळे तिला डिहायड्रेशनचा त्रास झाला. जेव्हा तिला अपात्र ठरवले गेले, तेव्हा तिला चक्कर आली आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. विनेशने वजन कमी करण्यासाठी काही खाल्लं नाही किंवा ती पाणीही प्यायली नाही. सर्व उपाय करून झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विनेशने केसही कापले आणि अगदी रक्तही काढलं. परंतु तरीही वजन कमी करण्यात तिला अपयश आलं.