संग्रहित छायाचित्र
प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाला फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवण्याच्या नादात स्वत: भारतीय संघच यात अडकल्याने शनिवारी (दि. २६) दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांना ११३ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. याबरोबरच तीन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या न्यूझीलंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. यामुळे तब्बल १२ वर्षांनी भारतावर मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर ही लढत झाली. याआधी भारताने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती. पुण्यातील सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २४५ धावांतच न्यूझीलंडच्या फिरकीसमोर गुडघे टेकले. या विजयासह न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. याबरोबरच मायदेशात सलग दोन कसोटी सामने गमावण्याची भारतीय संघाची २४ वर्षांतील ही तिसरी वेळ ठरली.
पहिल्या डावात न्यूझीलंडने २५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १५६ धावांत गारद झाल्याने पाहुण्यांना १०३ धावांची मोठी आघाडी मिळाली. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात कर्णधार टाॅम लॅथमच्या ८६ धावांच्या जोरावर सर्व बाद २५५ धावा करीत यजमान भारतासमोर अखेरच्या डावात विजयासाठी ३५९ धावांचे आव्हान ठेवले. सुमारे अडीच दिवसांचा खेळ बाकी असल्याने भारतीय फलंदाजांकडून प्रतिकार अपेक्षित होता. मात्र, सलामीवीर यशस्वी जयस्वालचा (७७) अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी मिचेल सॅंटनरच्या फिरकी माऱ्यासमोर नांगी टाकली. यामुळे ११३ धावांच्या फरकाने पराभव पत्करण्याची वेळ यजमानांवर ओढवली. पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा असे सामन्यात एकूण १३ बळी घेणारा ३२ वर्षीय डावखुरा गोलंदाज सॅंटनर न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
२०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा भारताला पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. या मालिकेत भारताचे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सारखे दिग्गज अपयशी ठरले होते. आता १२ वर्षांनंतर भारताला मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली आहे. २००० नंतर भारतात कसोटी मालिका जिंकणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने ही कामगिरी केली होती. यासह टीम इंडियाचा घरच्या मैदानावर सलग १८ मालिका विजयांची मालिका खंडित झाली.
जयस्वालनंतर जडेजाने ४२ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी न्यूझीलंडच्या फिरकी माऱ्यासमोर नांगी टाकली. कर्णधार रोहित शर्मा (८), शुबमन गिल (२३), विराट कोहली (१७), ऋषभ पंत (०), सर्फराझ खान (९), अश्विन (१८) यांनी निराशा केली. पहिल्या डावात ७ बळी घेणाऱ्या सँटनरने दुसऱ्या डावातही ६ विकेट्स घेत भारताचा पराभव निश्चित केला.
फलंदाजांच्या अपयशामुळे पराभव
प्रमुख फलंदाजांचे अपयश भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. या कसोटीच्या दोन्ही डावांत रोहित शर्माला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर विराटने दोन्ही डावांत मिळून केवळ १८ धावा केल्या. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील ऋषभ पंतने पहिल्या डावात १८ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही बंगळुरू कसोटीतील शतकवीर सर्फराझ खान यावेळी कोणतीही जादू दाखवू शकला नाही.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : पहिला डाव : ७९.१ षटकांत सर्व बाद २५९.
भारत : पहिला डाव : ४५.३ षटकांत सर्व बाद १५६.
न्यूझीलंड : दुसरा डाव : ६९.४ षटकांत सर्व बाद २५५ (टाॅम लॅथम ८६, ग्लेन फिलिप ४८, टाॅम ब्लंडेल, वाॅशिंग्टन सुंदर ४/५६, रवींद्र जडेजा ३/७२, रविचंद्रन अश्विन २/९७).
भारत : दुसरा डाव : ६०.२ षटकांत सर्व बाद २४५ (यशस्वी जयस्वाल ७७, रोहित शर्मा ८, शुबमन गिल २३, विराट कोहली १७, ऋषभ पंत ०, वाॅशिंग्टन सुंदर २१, सर्फराझ खान ९, रवींद्र जडेजा ४२, रविचंद्रन अश्विन १८, आकाशदीप १, जसप्रीत बुमराह नाबाद १०, मिचेल सॅंटनर ६/१०४, एजाज पटेल २/४३,
ग्लेन फिलिप १/६०).
प्लेअर ऑफ द मॅच : मिचेल सॅंटनर (सामन्यात १३ बळी)