मुंबईचा विश्वास हार्दिकवरच यंदा अपयशी ठरूनही आयपीएलच्या पुढील मोसमासाठी नेतृत्व
मुंबई ; पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेंशन यादी येताच मुंबई इंडियन्सने पुढील वर्षासाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. यानुसार मुंबईची कमान स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे कायम ठेवण्यात आली आहे.
जागतिक क्रिकेटची सर्वात आवडती टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या सिझनची क्रिकेटरसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यापूर्वी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. ही रिटेंशन यादी येताच मुंबई इंडियन्सने पुढील वर्षासाठी कर्णधार म्हणून हार्दिकवरच विश्वास दर्शवला आहे. यंदा झालेल्या सिझनमध्ये तो कर्णधार म्हणून साफ अपयशी ठरला होता. शिवाय मुंबईच्या फॅन्सनी सातत्याने त्याला टार्गेट केले होते.
मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा करून सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या कर्णधारपदाबाबत सातत्याने विविध बातम्या येत होत्या. दरम्यान, रिटेंशन यादी समोर येताच मुंबईने पुन्हा एकदा कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचं नाव निश्चित केले आहे. कर्णधार म्हणून मागील हंगाम हार्दिक पांड्यासाठी खूप वाईट होता, परंतु फ्रँचायझीने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
मुंबईने आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये सर्व मोठ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. यामध्ये हार्दिकसह रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईने जसप्रीत बुमराहसाठी सर्वाधिक १८ कोटी रुपये रक्कम मोजत त्याला संघात कायम ठेवले. तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी १६.३५ कोटी रुपये, माजी कर्णधार रोहित शर्माला १६.३० कोटी रुपये दिले आहेत. तिलक वर्माला ८ कोटी रुपयांत कायम ठेवण्यात आले आहे.
मुंबईसाठी यंदाचा हंगाम खूपच निराशाजनक होता. या संघाला गेल्या वर्षी गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहावे लागले होते. त्यांनी १४ पैकी फक्त चार सामने जिंकले. तेव्हापासून हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले होते. या स्टार खेळाडूवर सोशल मीडियावर सातत्याने निशाणा साधला जात होता. फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या तिन्ही आघाड्यांवर हार्दिक फेल ठरला होता. तरीदेखील भविष्यातील संघबांधणीच्या दृष्टिकोनातून फ्रँचायझीने हार्दिकवर विश्वास ठेवत त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.