सिडनी : ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सवर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २२ वर्षांनी पाकिस्तानविरूद्ध वनडे मालिका गमावत असताना संघाचा कर्णधार कोल्डप्ले कॉन्सर्टचा आनंद घेत आहे.वनडे मालिका ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर खेळवली जात होती.
तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकत मालिका बरोबरीत होती. तर तिसऱ्या वनडेत कांगारू संघ फेल ठरला आणि पाकिस्तानने बाजी मारत मालिका आपल्या नावे करत मोठा विजय मिळवला. या तिसऱ्या सामन्यापूर्वी विश्रांती म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघातील बड्या खेळाडूंना आराम दिला होता, जेणेकरून ते बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी तयारी करतील. पण कर्णधार कमिन्स पत्नीबरोबर कोल्ड प्ले कॉन्सर्टसाठी गेला होता.
पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन या प्रमुख खेळाडूंना भारताविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी वनडे मालिकेच्या निर्णायक सामन्यातून क्रिकेट ऑस्ट्रेलिया विश्रांती दिली होती. पण ऑस्ट्रेलियन कर्णधार पत्नीबरोबरचा कोल्ड प्ले कॉन्सर्टचा फोटो व्हायरल होत आहे.
पर्थमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. नेमका त्याचदिवशी १० नोव्हेंबरला कमिन्स कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी सिडनीमध्ये होता. त्याची पत्नी बेकीने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तिने कमिन्सबरोबरचा सेल्फी शेअर करत या कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियानेही हा व्हायरल फोटो पाहिला आणि त्यांनीही कमिन्सवर वक्तव्य केले. सिडनी मॉर्निंग हेराल्डने एक बातमी लिहिली होती आणि त्यात याचा उल्लेख करत लिहिले, “ऑस्ट्रेलिया सामन्यात पराभूत होत असताना कमिन्स कोल्डप्लेमध्ये कॉन्सर्टमध्ये का होता?” ऑस्ट्रेलियनने एक लेख देखील प्रकाशित केला आणि त्याचा मथळा होता, “कमिन्सच्या संगीत कार्यक्रमाने उन्हाळ्याची थंड सुरुवात केली.”
ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी तयारी करण्यासाठी विश्रांती दिली असताना कमिन्सच्या कार्यक्रमातील उपस्थितीवर टीका होत आहे. तर मुख्य म्हणजे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला सामना पर्थमध्येच खेळवला जाणार आहे, जिथे पाकिस्तान-ऑस्ट्रेलियामधील तिसरा वनडे सामना खेळवला गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे कसोटीतील महत्त्वाचे खेळाडू या सामन्यात खेळले असते तर या खेळपट्टीवर त्यांचा सरावही झाला असता.
यावर बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क म्हणाला, “पाकिस्तानविरुद्धची शेवटची वनडे आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी यात खूप अंतर आहे. कसोटी संघाचा भाग असलेले सर्व मोठे खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे होते. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकले असते तर परिस्थिती वेगळी असती, पण मालिका धोक्यात असताना तुम्ही तुमच्या खेळाडूंना विश्रांती देऊ शकत नाही.”