संग्रहित छायाचित्र
पॅरिस: मनू भाकरने भारताला दोन पदके जिंकून दिल्यानंतर आणखी एका महिला खेळाडूने पदक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या लवलिना बोर्गोहेन हिने बुधवारी (दि. ३१) उपांत्यपूर्व फेरीत धडक देत आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले.
लवलिनाने महिलांच्या ७५ किलो वजन गटातून अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवले. उपउपांत्यपूर्व फेरीत तिने नाॅर्वेची खेळाडू सुनिवा हॉफस्टॅडचा ५-० असा धुव्वा उडवला. सुनिवा ही दर्जेदार खेळाडू असल्याने ही लढत अटीतटीची होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र, २६ वर्षीय लवलिनाने पहिल्या फेरीपासूनच आक्रमक धोरण अवलंबले. अनेकदा प्रयत्न करूनही ती लवलिनाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरली. अखेर, प्रतिस्पर्धी खेळाडूला एकही गुण मिळवून न देता लवलिनाने दिमाखात उपांत्यपूर्व फेरी स्थान मिळवले.
टेबल टेनिस : श्रीजा अकुलाची घोडदौड
टेबल टेनिसमध्ये स्टार खेळाडू मनिका बत्रापाठोपाठ श्रीजा अकुलाने उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. तिने सिंगापूरच्या जिंग यांग हिच्यावर ४-२ अशा गेमने सरशी साधली. पहिला गेम गमावल्यानंतरही २६ वर्षीय श्रीजाने दबावाखाली न येता जोरदार पुनरागमन केले आणि हा सामना ९-११, १२-१०, ११-४, ११-५, १०-१२, १२-१० असा जिंकला.
मनिका आणि श्रीजा यांच्या रुपाने टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडूंनी प्रथमच ऑलिम्पिकची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
लवलिनासमोर कडवे आव्हान
उपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकल्यास लवलिनाचे किमान कांस्यपदक निश्चित होईल. मात्र, या अंतिम आठ खेळाडूंच्या फेरीत तिच्यासमोर कडवे आव्हान आहे. महिलांच्या ७५ किलो वजन गटामध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या चीनच्या ली क्वियान हिच्या आव्हानाला लवलिनाला सामोरे जावे लागेल. क्वियान हिने दोनदा एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मागील वर्षी झालेल्या एशियन गेम्समध्ये तिने अंतिम फेरीत लवलिनालाच पराभूत करून या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक पटकावले होते. क्वियानचा वेगवान आणि आक्रमक खेळ पाहता उपांत्यपूर्व फेरीची लढत लवलिनासाठी सोपी निश्चितच नसेल. यापूर्वी मात्र, तिने आतापर्यंत अनेकदा आपल्यापेक्षा बलाढ्य खेळाडूंना पराभूत केले आहे. टोकियो ऑलिम्पिकप्रमाणेच यावेळीही पदक जिंकण्याचा निर्धार करूनच लवलिना रिंगमध्ये उतरली आहे. उपांत्यपूर्व फेरीत क्वियानला पराभूत करून एशियन गेम्सच्या फायनलमधील पराभवाची परतफेड करण्याची संधी लवलिनाला चालून आली आहे. यात ती यशस्वी ठरते की नाही, याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.