जागतिक कसोटी मालिकेची अंतिम फेरी गाठणे भारतासाठी अवघड

मुंबई : न्यूझीलंडने भारताविरुद्ध ३-० अशी कसोटी जिंकून इतिहास रचला आहे. यामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खूपच कठीण झाला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ३-०ने पराभूत झाल्याने अडचणी वाढल्या, आता ऑस्ट्रेलियात ४-ने विजय आवश्यक

मुंबई : न्यूझीलंडने भारताविरुद्ध ३-० अशी कसोटी जिंकून इतिहास रचला आहे. यामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खूपच कठीण झाला आहे. सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाचपैकी चार कसोटी सामने जिंकावे लागतील.

भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून २२ नोव्हेंबरपासून उभय संघांत बाॅर्डवर-गावसकर सिरीजअंतर्गत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील कामगिरीवर भारताचे अंतिम फेरीत खेळणे अवलंबून आहे.  

दुसरीकडे, न्यूझीलंडने भारतात कसोटी मालिका जिंकून अंतिम फेरी गाठण्याचे दरवाजे उघडले आहेत. जर संघ भारतात हरला असता तर अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असता, पण त्याने इतिहास रचला आणि आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आतापर्यंत दोनदा झाली आहे. या दोन्ही वेळा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, दोन्ही वेळा या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी अंतिम फेरी गाठणे भारतासाठी आव्हानात्मक ठरले आहे. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. या संघाने ७४.२४ टक्के गुणांवरून ५८.३३ टक्के गुणांवर घसरण झाली आहे.  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिमधील भारताची शेवटची कसोटी मालिका आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत संघाला तेथे पाच कसोटी खेळायच्या आहेत. भारताने मालिका ३-२ ने जिंकली तरी संघ अंतिम फेरी गाठू शकणार नाही. चार कसोटी जिंकल्यास हा संघ कोणावरही अवलंबून न राहता अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल.

तथापि ऑस्ट्रेलियात भारताचे ४-०ने जिंकणे खूप कठीण आहे, कारण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांच्या नेतृत्वाखालीही संघ ऑस्ट्रेलियात जाऊन ८ पैकी केवळ ४ कसोटी जिंकू शकला. तर आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम ऑस्ट्रेलियाला जात आहे, ज्याने भारतात पाच कसोटी सामने गमावण्याचा विक्रम केला आहे.  

असे आहे इतर संघांचे गणित...

न्यूझीलंड

न्यूझीलंडचा संघ जेव्हा आशिया दौऱ्यावर आला तेव्हा एक कसोटी जिंकणेही त्यांच्यासाठी कठीण जाईल, असे मानले जात होते. श्रीलंकेविरुद्ध २-० असा पराभव पत्करून संघाने काही प्रमाणात हा अधिकार सिद्ध केला होता, पण त्यानंतर त्यांनी भारताचा ३-० असा पराभव करून सर्वांनाच चकित केले. आता अंतिम फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा कायम आहेत. ११ पैकी ६ कसोटी जिंकून न्यूझीलंड आता ५४.५५ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मालिकेपूर्वी, संघ ३७.५० गुणांसह सहाव्या स्थानावर होता आणि एक कसोटीही गमावल्यास संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असता. आता त्यांच्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी खेळायच्या आहेत. ही मालिका ३-० ने जिंकल्यानंतरच किवी संघ ६४.२८ गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाने चार मालिकेतील १२ पैकी ८ सामने जिंकले, ३ गमावले आणि एक अनिर्णित राहिला. यासह, संघ ६२.५० टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांचे ७ सामने बाकी आहेत, संघ भारताविरुद्ध घरच्या मैदानावर ५ सामने आणि श्रीलंकेविरुद्ध २ सामने श्रीलंकेत खेळणार आहे.या संघाला ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी संघाला पुढील ४ सामने जिंकावे लागतील.  

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर दोन मालिका खेळायच्या आहेत गेल्या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत भारतानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. यावेळी संघाने बांगलादेशातील कसोटी मालिका २-० ने जिंकून इतिहास रचला. ८ पैकी ४ कसोटी जिंकून संघ ५४.१७ टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेला आता मायदेशात श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी दोन सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. श्रीलंकेने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकली होती, मात्र पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. जर आफ्रिकेने चारही कसोटी जिंकल्या तर हा संघ ६९.४४ टक्के गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल. एक सामना जरी गमावला तारी या संघाचे गुण ५९ टक्क्यांपेक्षा जास्त कमी होतील.

श्रीलंका

श्रीलंकेकडे दोन कठीण मालिका शिल्लक आहेत श्रीलंकेने इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकून अंतिम फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. हा संघ ५५.५६ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन आव्हानात्मक मालिका बाकी आहेत. हा संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार असून, दोन्ही मालिका प्रत्येकी दोन सामन्यांच्या आहेत.

जर लंकेने चारही कसोटी जिंकल्या तर हा संघ ६९.२३ टक्के गुणांसह अंतिम फेरीत पोहोचेल. चारपैकी तीन कसोटी जिंकल्यानंतरही लंकेचे ६१.५३ टक्के गुण होतील आणि त्यांच्या फायनलच्या आशा आशा जिवंत राहतील. मात्र, हा संघ दोन कसोटीत हरला तर अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

पाच संघ फायनलचे दावेदार

घरच्या मैदानावर झालेल्या भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पाच संघ दावेदार आहेत.  ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंडव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे संघही फायनलमध्ये प्रवेश करू शकतात.  इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

जागतिक कसोटी मालिका : गुणतालिका

 

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण टक्केवारी
ऑस्ट्रेलिया 12 8 3 1 62.50
भारत 14 8 5 1 58.33
श्रीलंका 9 5 4 0 55.56
न्यूझीलंड 11 6 5 0 54.55
द. आफ्रिका 8 4 3 1 54.17

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story