IND-W vs IRE-W 3 rd ODI
IND-W vs IRE-W 3 rd ODI : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यात, टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 5 गडी गमावून 435 धावा केल्या. आणि आयर्लंडसमोर विजयासाठी 436 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यादरम्यान स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी धमाकेदार कामगिरी करत टीम इंडियासाठी शतके झळकावली. प्रतीकाने 154 धावांची दमदार खेळी केली. त्यांच्यासोबत रिचा घोषनेही महत्त्वाची भूमिका बजावली.
उभारली चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या...
यासह भारतीय महिला संघाने राजकोटमध्ये महिला एकदिवसीय इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे, ज्यांनी 2018 मध्ये आयर्लंडविरुद्धच 4 बाद 491 धावा केल्या होत्या.
महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारणारे संघ....
1. न्यूझीलंड विरूध्द आयर्लंड : 4 बाद 491 (8 जून 2018)
2. न्यूझीलंड विरूध्द पाकिस्तान : 5 बाद 455 (29 जानेवारी 1997)
3. न्यूझीलंड विरूध्द आयर्लंड : 4 बाद 440 (13 जून 2018)
4. भारत विरूध्द आयर्लंड : 5 बाद 435 (15 जानेवारी 2025)
5. न्यूझीलंड विरूध्द आयर्लंड : सर्वबाद 418 (10 जून 2018)
पुरुष संघाचाही विक्रमही काढला मोडीत...
स्मृती मंधनाच्या नेतृत्वाखाली भारताच्या मुलींनी पुरुष संघाचाही विक्रम मोडीत काढला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, भारतीय पुरुष संघाने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 50 षटकांत 418 धावा केल्या होत्या, जो आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या होता. तथापि, हा विक्रम आता महिला संघाने मोडला आहे.
The record is broken twice in 3 days! pic.twitter.com/1RfsNghswC
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 15, 2025
भारताने 72 तासांत स्वतःचाच मोडला विक्रम....
वास्तविक, टीम इंडियाने 12 जानेवारी रोजी आयर्लंडविरुद्ध 370 धावसंख्या उभारली होती . ही त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती. पण आता सुमारे 72 तासांनंतर 400 हून अधिक धावसंख्या उभारून भारताने 72 तासांत स्वतःचाच विक्रम मोडित काढला आहे.
टीम इंडियाने आयर्लंडला दिले 436 धावांचे लक्ष्य...
राजकोट एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, मंधाना आणि प्रतीका संघासाठी ओपनिंग करण्यासाठी आल्या. दोघींनीही टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात दिली. मंधाना आणि प्रतीका यांच्यात 233 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान मंधनाने स्फोटक खेळी केली. तिने 80 चेंडूंचा सामना करत 135 धावा केल्या. यादरम्यान तिने 12 चौकार आणि 7 षटकार मारले.
मंधानासोबत, प्रतीकानेही टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. तिने 129 चेंडूंचा सामना करत 154 धावा केल्या. प्रतीकाच्या खेळीत 20 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. टीम इंडियाकडून रिचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. तिने 42 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. यादरम्यान तिने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. तेजलने 25 चेंडूंचा सामना करत 28 तर हरलीन देओलने 15 धावांची खेळी केली.