Kho Kho World Cup 2025 (Team india)
Kho-Kho World Cup 2025 (India vs Nepal) : पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेच्या रोमांचक सलामीच्या सामन्यात भारताने नेपाळचा 42-37 असा पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. खेळाच्या पहिल्या सात मिनिटांत भारताने 24-0 अशी आघाडी घेतली तर पुढच्या सात मिनिटांत नेपाळने 20 गुण मिळवले. मध्यंतरापर्यंत भारताकडे 24-20 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतरच्या 14 मिनिटांच्या खेळात भारतीय संघाने 18 गुण मिळवले तर नेपाळ संघाला फक्त 17 गुण मिळवता आले.
अशाप्रकारे कर्णधार प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखाली भारताच्या अष्टपैलू कामगिरीने खो-खोच्या शानदार दिवसाची सांगता केली आणि संघाला एक उत्तम सुरुवात दिली. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दोन्ही देशांच्या बचावपटू, आक्रमणपटू आणि वजीरांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
पहिल्याच सत्रात संघाने 24 गुण मिळवले. टीम इंडियाच्या आक्रमकांनी चमकदार कामगिरी केली आणि बचाव करताना नेपाळला एकही गुण मिळवू दिला नाही. दुसऱ्या सत्रात नेपाळने चांगले पुनरागमन केले आणि अखेरीस दोन्ही संघांचा स्कोअर 24-20 असा होता. तिसऱ्या सत्रात आक्रमणात परतताना, भारतीय संघाने लय कायम ठेवली आणि 7 मिनिटांच्या खेळात 20 गुण मिळवले, ज्यामुळे संघाचे एकूण गुण 42 झाले. प्रत्युत्तरादाखल, नेपाळला सामना जिंकण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या सत्रात 43 गुण मिळवणे गरजेचे होते. पण, टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत नेपाळ संघाला फक्त 37 गुणांवर रोखले.
The hosts, the favourites, the winners of the first-ever #KhoKhoWorldCup clash! 🔥
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 13, 2025
Congratulations, #TeamIndia 🇮🇳#TheWorlGoesKho #Khommunity #KhoKho #KKWC2025 pic.twitter.com/um85Gxt5g5
प्रदीप वाईकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता ग्रुप अ मधील आपला पुढचा म्हणजेच दुसरा सामना मंगळवार, 14 जानेवारी रोजी ब्राझीलसोबत खेळेल. पहिल्या सामन्यातील विजयानंतर सर्व भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले असेल आणि त्यांना विजयी मालिका कायम ठेवायची असेल. प्रत्येकी 5 संघांचे एकूण 4 गट तयार करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ग्रूपमधील फक्त अव्वल 2 संघच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करू शकतील.
दरम्यान, पहिल्या खो-खो विश्वचषकाची सुरुवात सोमवारी रंगारंग उद्घाटन समारंभाने झाली, ज्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मशाल प्रज्वलित करून अधिकृतपणे उद्घाटनाची घोषणा केली. या कार्यक्रमाला क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (IOA) च्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खचाखच भरलेल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांनी उद्घाटन समारंभाचा आणि त्यानंतर सामन्याचा आनंद घेतला.
स्पर्धेच्या अधिकृत सुरुवातीपूर्वी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या दरम्यान, खो खो फेडरेशन ऑफ इंडिया (केकेएफआय) कडून पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांसाठीच्या विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.