संग्रहित छायाचित्र
बंगळुरू : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा पराक्रम करणारी भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ही माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची अवस्था पाहून भावूक झाली. तिने आपल्या सहकारी खेळाडूंना आर्थिक व्यवस्थापन आणि काळजीपूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला आहे.
५२ वर्षीय विनोद कांबळी याला २१ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. त्याच्या उपचाराचा खर्च सचिन तेंडुलकर आणि इतर मित्रांनी केला. नंतर माजी कर्णधार कपील देव यांनी त्याला मदत केली. आर्थिक परिस्थिती वाईट अससल्याने यापूर्वीदेखील सचिन आणि इतर मित्रांनी त्याला अनेकदा मदत केली आहे.
यापूर्वी गुरू रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्याला नीट उभेही राहता येत नसल्याचे व्हीडीओमध्ये स्पष्ट दिसत होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंधू म्हणाली की, मी विनोद कांबळीचा व्हीडीओ पाहिला. तुम्ही अतिशय हुशारीने पैशाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला भविष्यातही तुम्हाला उपयोगी पडेल अशा पद्धतीने गुंतवणूक करावी लागेल. म्हणूनच मी म्हणते की तुम्ही गुंतवणूक करा आणि तुमच्या पैशाची काळजी घ्या आणि पैसे वाया घालवू नका.
जेव्हा तुम्ही अव्वल खेळाडू असता तेव्हा तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या लोकांकडून पैसे मिळतात. तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमचा कर भरावा लागेल. हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्ही संकटात आहात. माझे व्यवस्थापन माझे पालक करतात. माझे पती माझ्या गुंतवणुकीची काळजी घेतात, आतापर्यंत मला कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागला नाही, असेही यावेळी सिंधूने सांगितले.