Rohan Bopanna (file pic)
Australian Open 2025 (Bopanna-Barrientos) : माजी जागतिक नंबर वन डबल्स खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा नवा कंबोडियन जोडीदार निकोलस बॅरिएंटोस यांना ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी प्रकारात पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. यासह त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बोपण्णा आणि बॅरिएंटोस या 14 व्या मानांकित जोडीला स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझ आणि जौमी मुनार यांच्याकडून 7-5, 7-6 असा पराभव पत्करावा लागला.
बोपण्णा आणि त्याच्या जोडीदाराने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या गेममध्ये त्यांची सर्व्हिस राखली. तथापि, स्पॅनिश जोडीने हळूहळू त्यांची लय शोधली आणि बेसलाइनवर त्यांच्या कामगिरीत सातत्य दाखवले. यादरम्यान, स्पॅनिश जोडीने महत्त्वपूर्ण ब्रेक पॉइंट मिळवत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही सामना बरोबरीचा राहिला पण टायब्रेकरमध्ये स्पॅनिश जोडीने बाजी मारत विजय मिळवला.
यापूर्वी, 44 वर्षीय बोपण्णाने 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनसह येथे विजेतेपद जिंकले होते. यासह तो ओपन एरामध्ये ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. तथापि, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या ट्यूरिन एटीपी फायनल्सनंतर बोपण्णा आणि एब्डेन यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अन्य लढतीत, भारताचा अव्वल एकेरी खेळाडू सुमित नागल देखील पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचॅककडून पराभूत झाला आणि पराभवासह त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.