Vijay Hazare Trophy २०२४-२५ | ६ डावात ५ शतके, 'या' फलंदाजाची तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियात निवड होण्याची शक्यता...

सध्या वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली फॉर्मसाठी झगडत आहेत. त्यामुळे निवड समिती करुण नायरला पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 14 Jan 2025
  • 10:35 am
karun nair ,

karun nair (file pic)

Vijay Hazare Trophy 2024-25 | भारतीय कसोटी क्रिकेटमधील दोन त्रिशतकवीरांपैकी एक करुण नायर सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्यानं गेल्या सहा सामन्यांमध्ये पाच शतके झळकावली आाहेत. या जोरावर त्याची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळणाऱ्या ३३ वर्षीय करुण नायरवर सध्या अनेकांच्या नजरा आहेत. भारतीय निवड समिती त्याच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून आहे. टीम इंडिया सध्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे. सध्या वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली फॉर्मसाठी झगडत आहेत. त्यामुळे निवड समिती करुण नायरला पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहे. विजय हजारे चषकातील कामगिरीमुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू शकतात.

करुण नायरनं २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकही झळकावलं आहे. परंतु काही खराब खेळींनंतर त्याला २०१७ मध्ये संघातून वगळण्यात आलं. तेव्हापासून तो टीम इंडियात कमबॅक करू शकलेला नाही. बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या करुण नायरनं डिसेंबर २०२२ मध्ये एक भावनिक ट्विट केलं होतं. ‘‘प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे,’’ असं नायरनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. आता या कष्टाचं चीज होऊन त्याला भारतीय संघात पुन्हा संधी मिळू शकते.

करुण नायरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

 करुण नायरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी सहा कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले. त्यानं सात कसोटी डावांमध्ये ६२.३३ च्या सरासरीनं ३७४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३०३ आहे. डिसेंबर २०१६ मध्ये चेन्नईत त्यानं हा पराक्रम केला होता. त्यानं ३८१ चेंडूंत नाबाद ३०३ धावा करताना ४ षटकार आणि ३२ चौकार लगावले होते. याशिवाय त्यानं दोन एकदिवसीय सामन्यांत ४६ धावा केल्या आहेत.

Share this story

Latest