संग्रहित छायाचित्र
पॅरिस: उपांत्यपूर्व फेरीत दहा खेळाडूंसह खेळूनही जिगरबाज खेळ करीत ब्रिटनचे तगडे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे परतवून लावत ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघाने हाॅकीमध्ये रविवारी (दि. ४) उपांत्य फेरीत धडक दिली.
निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. त्यानंतर निकालाची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा पर्याय अवलंबण्यात आला. यात गोलरक्षक श्रीजेशने शानदार कामगिरी करीत दोन गोल वाचवले आणि भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. भारताने शूटआऊटमध्ये सलग चार गोल केले. ब्रिटीश संघाला दोनच गोल करता आले.
भारताचा बचावपटू अमित रोहिदास याला १२व्या मिनिटाला रेफ्रींनी रेड कार्ड दिले. त्याने इंग्लंडच्या आघाडीपटूला चुकीच्या पद्धतीने पाडले, असा दावा रेफ्रींचा होता. या फाऊलसाठी पिवळे कार्ड देणे पुरेसे होते, असे माजी भारतीय ऑलिम्पियन जुगराज सिंग यांनी सांगितले. रोहिदास बाहेर गेल्यामुळे उर्वरित ४८ मिनिटे भारतावर १० खेळाडूंनिशी खेळण्याची वेळ आली. मात्र, तरीही भारतीय संघाने इंग्लंडला १-१ने बरोबरीत रोखत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला आणि नंतर गोलरक्षक श्रीजेशच्या अफलातून बचावाच्या जोरावर बाजी मारली.
कर्णधार हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय आणि राजकुमार पाल यांनी शूटआऊटमध्ये भारताकडून यशस्वी गोल केले. तर इंग्लंडसाठी जेम्स ॲल्व्हरीने पहिल्या प्रयत्नात आणि जॅक वॉलिसने दुसऱ्या प्रयत्नात गोल केले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात कॉनर विल्यमसनला तर चौथ्या प्रयत्नात फिलिप रोपरला श्रीजेशचा बचाव भेदता आला नाही. तत्पूर्वी, निर्धारित वेळेत भारतातर्फे हरमनप्रीत आणि इंग्लंडतर्फे ली मॉर्टन यांनी गोल केला.
पेनल्टी शूटआऊटमध्येच नव्हे तर संपूर्ण सामन्यात श्रीजेशने शानदार खेळ केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि ग्रेट ब्रिटन या दोघांना प्रत्येकी तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. गोलरक्षक श्रीजेशने शानदार खेळ करत दोन शानदार बचाव केले. उर्वरित एक पेनल्टी काॅर्नर अमित रोहितदासने वाचवला. दुसरीकडे, भारतीय कर्णधार हरमनप्रीतला व्यवस्थित शॉट मारता न आल्याने भारताचा पेनल्टी कॉर्नर वाया गेला.
सामन्यातील दोन्ही गोल तिसऱ्या क्वार्टरमध्ये झाले. २२व्या मिनिटाला हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाच मिनिटांनी म्हणजे २७व्या मिनिटाला ली मॉर्टनने गोल करत इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
गांगुलीस्टाईल सेलिब्रेशन!
पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर सुमितकुमारने टी शर्ट काढून जल्लोषात विजय साजरा केला. ते पाहून २००२च्या नॅटवेस्ट सिरीजमध्ये अखेरच्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारल्यानंतर भारताचा कर्णधार सौरभ गांगुलीने याच पद्धतीने केलेल्या सेलिब्रेशनची आठवण भारतीयांना झाली. या दोघांच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.