केएल राहुल आणि गौतम गंभीर
भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या केएल राहुलचा बचाव केला आहे. सोशल मीडिया भारताचा अंतिम संघ ठरवू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.दुसऱ्या कसोटीपूर्वी बुधवारी (दि. २३) झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाले, ‘‘प्लेइंग इलेव्हन हे सोशल मीडियावरून ठरवले जात नाही. त्यामुळे सोशल मीडिया तज्ज्ञ काय विचार करतात, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. व्यवस्थापनाचे म्हणणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. व्यवस्थापन केएल राहुलला पाठीशी उभे आहे.’’
बंगळुरू कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून राहुलला केवळ १२ धावा करता आल्या. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. भारतीय संघाने हा सामना ८ विकेटने गमावला. यानंतर केएल राहुलवर सोशल मीडियावर टीका होत आहे.कसोटी सामन्यासाठी अंतिम संघ निवडणे नेहमीच कठीण असते. यामध्ये स्पर्धा असणे चांगले आहे.
शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आम्ही अद्याप अंतिम संघ ठरवलेला नाही. बांगलादेशविरुद्ध कानपूरच्या अवघड खेळपट्टीवर राहुलने चांगली खेळी केली. आमचे संघ व्यवस्थापन त्यांना सपोर्ट करेल. राहुलने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ६८ धावा केल्या होत्या. बंगळुरूच्या पराभवाबाबत म्हणाल तर क्रिकेट खेळ असाच असतो. आपण कानपूरसारखे दिवस एन्जॉय केले, तर बंगळुरूमध्येही जे घडले ते आपल्याला सहन करावे लागेल, असेही यावेळी गंभीर म्हणाला.