रवींद्र जडेजा सोबत रविचंद्रन अश्विन
#चेन्नई :
feedback@civicmirror.in
बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी करत कसोटीतील सहावे शतक झळकावले. अश्विनने रवींद्र जडेजासोबत आश्वासक भागीदारी केल्याने घरच्या मैदानावर भारताला दमदार धावसंख्या उभारता आली. खेळ संपला तेव्हा भारताची स्थिती ८० षटकांनंतर ६ बाद ३३९ धावा अशी होती.
या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद १९५ धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या हसन महमूदने सुरुवातीलाच रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहलीला माघारी धाडत भारताला धक्के दिले. यष्टिरक्षक ऋषभ पंतलाही त्यानेच बाद केले.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. बांगलादेशचा तरुण गोलंदाज हसन महमूदने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या तिघांना माघारी धाडले. भारताची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल जोडीने केली. हसन महमूदने प्रथम रोहित शर्माला ६ धावांवर बाद केले. त्यानंतर शुभमन गिलला शून्यावर बाद केले. या दोन धक्क्यानंतर विराट कोहलीला ६ धावांवर बाद करून भारताला तीन मोठे धक्के दिले.
त्यामुळे भारताची सुरुवात खूपच खराब झाली. हसन महमूदने भेदक आणि अचूक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना स्थीर होऊ दिले नाही. हसनने मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने तीन कसोटीमध्ये २५ च्या सरासरीने १४ विकेट घेतल्या आहेत. हसनच्या नावावर २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३० विकेट आहेत. तसेच २२ टी-२० सामन्यात १८ विकेट आहेत. तो उत्कृष्ट गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जातो. हसन महमूद ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो. त्याला लक्ष्मीपूर एक्सप्रेस म्हणूनही ओळखले जाते.
एमए चिदंबरमच्या खेळपट्टीवर यशस्वी जैस्वालची बॅट पुन्हा एकदा तळपली. रोहित-विराट आणि शुभमनसारखे फलंदाज थोडक्यात बाद झाले असताना डावखुरा सलामीवीर जैस्वालने शानदार अर्धशतक झळकावले. जैस्वालने पंतसोबत अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले.
त्याबरोबर जैस्वालने ८९ वर्षे जुना कसोटी विक्रम मोडीत काढला आहे. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून जैस्वाल प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम करत आहे. त्याने मायदेशात पहिल्या १० डावात ७५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हेडलीच्या नावावर होता.
हेडलीने १९३५ मध्ये १० कसोटी डावांनंतर मायदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. हेडलीने ७४७ धावा केल्या होत्या. जैस्वालने पहिल्या सत्रातच हा विक्रम मोडला. यापूर्वी घरच्या कसोटी सामन्यातील ९ डावात त्याने ७१२ धावा केल्या होत्या. खेळाच्या पहिल्या सत्रात ३७ धावा करत त्याने हेडलीचा विक्रम मोडला. यष्टिरक्षक ऋषभ पंतने ६३३ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
पंतने स्फोटक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. एकेवेळी भारताची धावसंख्या ३ बाद ३४ धावा अशी होती. यानंतर पंतने यशस्वी जैस्वालसह संघाची पडझड थांबवली. त्याने ५२ चेंडूत ३९ धावांची जलद खेळी केली. या दोघांनंतर जडेजा आणि अश्विनने संघाची पडझड थांबवत डावाला आकार दिला.
अश्विनने अवघ्या १०८ चेंडूत शतक झळकावत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. अश्विन भारताकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर जडेजा सातव्या क्रमांकावर. अश्विनने दमदार फटकेबाजी करत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर उपस्थित होते. त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. खेळ संपताना तो १०२ आणि रवींद्र जडेजा ८६ धावांवर नाबाद खेळत होते. वृत्तसंंस्था