Capital of defeat! : दिल्ली ठरली पराभवाची राजधानी!

अनेक दर्जेदार खेळाडू संघात असूनही आयपीएल-१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला शनिवारी (दि. १५) सलग पाचव्या पराभवास सामोरे जावे लागले. फलंदाजी आणि गोलंदाजीत वरचढ कामगिरी करीत राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने दिल्लीवर २३ धावांनी सहज विजय मिळवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 16 Apr 2023
  • 02:54 am
दिल्ली ठरली पराभवाची राजधानी!

दिल्ली ठरली पराभवाची राजधानी!

सलग पाचव्यांदा हार, राॅयल चॅलेंजर्स बंगलोर २३ धावांनी विजयी

#बंगळुरू

अनेक दर्जेदार खेळाडू संघात असूनही आयपीएल-१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला शनिवारी (दि. १५) सलग पाचव्या पराभवास सामोरे जावे लागले. फलंदाजी आणि गोलंदाजीत वरचढ कामगिरी करीत राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने दिल्लीवर २३ धावांनी सहज विजय मिळवला.

फाॅर्मात असलेल्या विराट कोहलीने घरच्या मैदानावरील या सामन्यात झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर बंगलोरने ६ बाद १७४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्याने ३४ चेंडूंत ५० धावा करताना १ षटकार आणि ६ चौकार लगावले. कर्णधार फाफ डुप्लेसिस (२२), महिपाल लोमरोर (२६), ग्लेन मॅक्सवेल (२४) आणि शाहबाज अहमद (नाबाद २०) यांनी उपयोगी योगदान देत बंगलोरला पावणेदोनशेच्या घरात मजल मारून दिली.  प्रत्युत्तरात, दिल्लीला २० षटकांत ९ बाद १५१ धावाच करता आल्या. मध्यफळीतील अनुभवी फलंदाज मनीष पांडेने सर्वाधिक ५० धावांचे योगदान दिले. आयपीएलमध्ये पदार्पणाचा सामना खेळणारा २६ वर्षीय मध्यमगती गोलंदाज विजयकुमार वैशाख याने प्रभावी मारा करताना ४ षटकांत अवघ्या २० धावांमध्ये ३ बळी घेतले. मोहम्मद सिराजने २ तर वेन पार्नेल, हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्याला चांगली साथ दिली.  या स्पर्धेतील तिसरे आणि सलग दुसरे अर्धशतक झळकावणारा विराट सामनावीर ठरला.

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट आणि फाफ यांनी बंगलोरला चांगली सुरुवात करून देताना ४.४ षटकांत ४२ धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट-महिपाल जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ४७ धावांची भागिदारी करीत संघाच्या डावाला बळकटी दिली. अखेरच्या षटकांत शाहबाज अहमद (१२ चेंडूंत नाबाद २० धावा, ३ चौकार) वगळता इतर फलंदाज वेगाने धावा करण्यात अपयशी ठरल्याने बंगलोर संघाला संधी असूनही दोनशेचा टप्पा ओलांडता आला नाही. इम्पॅक्ट प्लेअर अनुज रावतने निराशा करताना २२ चेंडूंत नाबाद १५ धावांची संथ खेळी केली. दिल्लीतर्फे मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

विजयासाठी १७५ धावांचे आव्हान दिल्लीला पेलवले नाही. निम्मा संघ ५३ धावांत गारद झाला, तेव्हाच या संघाचा पराभव निश्चित झाला होता. पृथ्वी शाॅची (०) अपयशाची मालिका या सामन्यातही कायम राहिली. मिचेल मार्श (०), यश धूल (१), कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (१९), अभिषेक पोरेल (५) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. मनीष पांडेने (३८ चेंडूंत ५० धावा, १ षटकार, ५ चौकार) अक्षर पटेलच्या (२१) मदतीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आयपीएल पदार्पणवीर वैशाखने किफायती मारा करताना वाॅर्नर, अक्षर आणि ललित यादव (४) यांचे बळी घेतले. या विजयासह बंगलोरचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. सलग पाचव्या पराभवामुळे दिल्लीने तळातील स्थान कायम राखले आहे. वृत्तसंस्था

संक्षिप्त धावफलक

राॅयल चॅलेंजर्स बंगलोर : २० षटकांत ६ बाद १७४ (विराट कोहली ५०, महिपाल लोमरोर २६, ग्लेन मॅक्सवेल २४, फाफ डुप्लेसिस २२, शाहबाज अहमद २०, मिचेल मार्श २/१८, कुलदीप यादव २/२३, अक्षर पटेल १/२५, ललित यादव १/२९) विवि दिल्ली कॅपिटल्स : २० षटकांत ९ बाद १५१ (मनीष पांडे ५०, आन्रिख नाॅर्किया नाबाद २३, अक्षर पटेल २१, डेव्हिड वाॅर्नर १९, विजयकुमार वैशाख ३/२०, मोहम्मद सिराज २/२३, वेन पार्नेल १/२८, हर्षल पटेल १/३२, वानिंदू हसरंगा १/३७).

सामनावीर : विराट कोहली

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest