संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid)याचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपत आहे. यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक कोण, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनेक देशी-विदेशी माजी क्रिकेटपटूंनी ऑफर दिल्याचेही समोर आले. आता मात्र बीसीसीआयने आम्ही ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही माजी खेळाडूला ऑफर दिली नसल्याचे दावा केला. मात्र, रिकी पाॅंटिंग (Ricky Ponting)आणि जस्टीन लॅँगर (Justin Langer) या ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी मात्र बीसीसीआयकडून आलेली ऑफर नाकारल्याचे सांगितले.
टीम इंडियाच्या ‘हेड कोच’च्या ऑफरवरून अशा प्रकारचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूशी संपर्क साधला नाही, असा दावा या संघटनेचे सचिव जय शाह (Jai Shah)यांनी केला होता. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि माजी विश्वचषक चॅम्पियन कर्णधार रिकी पाँटिंग यांनी जाहीरपणे सांगितले होते की, बीसीसीआयने त्यांना टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिली आहे. मात्र, त्यांनी याला नकार दर्शवला. यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत संघटना समजली जाणारी बीसीसीआय तोंडघशी पडली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘मी किंवा बीसीसीआयने कोणत्याही ऑस्ट्रेलियनला प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिलेली नाही. व्हायरल होत असलेली बातमी चुकीची आहे. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद हे सर्वात महत्त्वाचे असते. भारतीय संघाचे जगातील सर्वाधिक चाहते आहेत. या नोकरीसाठी भरपूर व्यावसायिकता आवश्यक आहे, कारण तुम्ही जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसोबत काम करत असता.’’ आम्ही टीम इंडियासाठी योग्य पद्धतीने आणि प्रतिभेनुसार प्रशिक्षक निवडू. भारतीय क्रिकेटचे सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीची निवड करण्यावर आमचे लक्ष आहे. त्याला देशांतर्गत क्रिकेटचीही माहिती असली पाहिजे जेणेकरून तो टीम इंडियाला पुढच्या स्तरावर नेऊ शकेल, असेही जय शाह यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग याने ‘आयसीसी रिव्ह्यू’शी बोलताना सांगितले होते की, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने मला संपर्क साधला होता. परंतु मी या ऑफरबाबत कधीच विचार केला नव्हता. मानसिकदृष्ट्या अद्याप यासाठी मी तयार नाही. त्यामुळे मी नकार कळवला. मात्र, मी ही जबाबदारी घ्यावी, अशी माझ्या मुलाची इच्छा आहे.’’
लखनौ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक लँगर यांनीही आपण बीसीसीआयची ऑफर नाकारल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. ‘‘अनपेक्षितपणे मला बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचची ऑफर देण्यात आली. मात्र, मी यासाठी तयार नाही. मला माहिती आहे की ही एक मोठी भूमिका आहे. चार वर्षे ऑस्ट्रेलियन संघासोबत हे काम केल्यानंतर दमछाक होत आहे. त्यामुळे काही काळासाठी मी कोणत्याही राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद न स्वीकारण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात माझे केएल राहुलशी बोलणे झाले. त्याने मला सांगितले की, जर तुम्हाला वाटत असेल की आयपीएल संघात दबाव आणि राजकारण आहे, तर भारताचे कोचिंग त्यापेक्षा हजार पटीने जास्त आहे. मला वाटते की हा चांगला सल्ला होता. मी त्यापूर्वीच बीसीसीआयला माझी भूमिका कळवली होती,’’ असे लॅंगरने सांगितले.
...म्हणून वाढवला द्रविडचा कार्यकाळ
बीसीसीआयने १३ एप्रिल रोजी रात्री उशिरा उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा तिन्ही फॉरमॅटसाठी जुलै २०२४ ते डिसेंबर २०२७ असा असेल. राहुल द्रविडला नोव्हेंबर २०२१ मध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्याच वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ गटसाखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात संघाने पुन्हा उपांत्य फेरी खेळली. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला होता, परंतु टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे त्याचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला होता.