संग्रहित छायाचित्र
मुंबई : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर ही जबाबदारी सोपवण्यासाठी बीसीसीआयने आतापर्यंत अनेक देशी-विदेशी माजी खेळाडूंसोबत संपर्क साधला आहे. त्यापैकी ‘टर्बोनेटर’ (turbonator') म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजनसिंग (Harbhajan Singh) याच्या नावाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.
बीसीसीआयने हरभजनला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर दिल्याचे कळते. दावेदारांच्या यादीत आतापर्यंत गौतम गंभीर, स्टीफन प्लेमिंग, जस्टीन लॅंगर, रिकी पॉन्टिंग या माजी दिग्गजांची नावे समोर आली आहेत. दरम्यान, आता माजी फिरकीपटू हरभजन सिंगचं नावही समोर आले आहे. वृत्तानुसार, हरभजन सिंगला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर मिळाली आहे. याबाबत बीसीसीआय आणि भज्जी यांच्यात बोलणी सुरु आहे.
राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कोण असतील, याचा शोध सध्या सुरू आहे. त्यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकापर्यंत आहे. विश्वचषकानंतर टीम इंडियाला नवे प्रशिक्षक मिळतील. त्यासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत. टीम इंडियाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक विदेशी असेल, अशी चर्चा आतापर्यंत होती. मात्र गंभीरचे नाव चर्चेत आल्यावर हा विषय मागे पडला. गंभीरकडून या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यातच भज्जीचे नाव वेगाने पुढे आल्याने आणि खुद्द भज्जीने याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने गंभीरचे नाव मागे पडले आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग किंवा दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमण्यास बीसीसीआय उत्सुक होती. या दोघांनी नकार दिल्यास लँगरबाबत बीसीसीआय सकारात्मक होती. मात्र, चेन्नईसह इतर अनेक टी-२० संघांचा प्रशिक्षक असल्याने न्यूझीलंडचा माजी कर्णधार फ्लेमिंगने बीसीसीआयला नकार कळवला आहे. तरीदेखील, त्याचे मन वळवण्याची जबाबदारी बीसीसीआयने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे सोपवल्याचीही चर्चा आहे. धोनी आणि फ्लेमिंग दीर्घकाळ सोबत असल्याने दोघांमध्ये चांगले बाॅंडिंग आहे. यामुळे धोनी फ्लेमिंगचे मन वळवण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा बीसीसीआयला आहे. पाॅंटिंग आणि लॅंगर यांनी बीसीसीआयच्या प्रस्तावाला नकार दिल्याने या दोघांचीही नावे आता मागे पडली आहेत.
रिपोर्ट्सनुसार, हरभजन नवी भूमिका पार पडण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाल्यास मी त्यासाठी तयार असल्याचं भज्जीनं सांगितलं. तो म्हणाला की, “मी अर्ज करेन की नाही हे सध्या माहित नाही. पण मला वाटतं की, टीम इंडियाचं कोचिंग हे मॅन मॅनेजमेंटचे काम आहे. खेळाडूंना फक्त तेथे मॅनेज करावं लागेल. कव्हर ड्राइव्ह किंवा पुल शॉट कसा मारायचा हे कोणालाही शिकवावं लागत नाही. तसेच गोलंदाजाला गोलंदाजी कशी करायची हे तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. याबद्दल सर्वांनाच माहित आहे. फक्त थोडंसं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मला संधी मिळाली तर मी नक्की कोचिंग करेन. क्रिकेटनं मला सर्व काही दिलं आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटला परत काही देण्याची संधी आली तर मी नक्कीच ते करेन.”