राष्ट्रवादीकडून 'वंचित' वसंत मोरे आंबेडकरांच्या दारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) (MNS) राम राम ठोकून शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) लोकसभा निवडणूकीचे तिकीट मिळण्यापासून वंचित राहिलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी शुक्रवारी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली.

Vasant More

राष्ट्रवादीकडून 'वंचित' वसंत मोरे आंबेडकरांच्या दारी

''कात्रज पॅटर्न'' पुण्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी उमेदवारी देण्याची केली मागणी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) (MNS) राम राम ठोकून शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) लोकसभा निवडणूकीचे तिकीट मिळण्यापासून वंचित राहिलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी शुक्रवारी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. त्यामुळे आता मोरे वंचितचे उमेदवार असणार का? हे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे. 

मनसेकडून पुणे लोकसभेचे उमेदवार मोरे असतील असे बोलले जात होते. मात्र मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे नाव पुढे आल्याने मोरे यांनी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पुण्याची जागा कॉंग्रेस पक्षाला असल्याने कॉंग्रेसने उमेदवार दिला. यामुळे मोरे यांची गोची झाली असून त्यांनी मनसे सोडण्यापूर्वी कोणत्या तरी एक पक्ष ठरवायला हवा होता. असे बोलले गेले. मात्र त्यानंतर मोरे यांनी काही झाले तरी पुणे लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचे जाहीर करुन अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचे जाहीर केले आहे. असे असतानाच महाविकास विकास आघाडी सोबत वंचित जाणार नसल्याचे स्पष्ट होत असताना मोरे यांनी आंबेडकरांची भेट घेतल्याने पुण्यातील लोकसभा निवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण होईल असा अंदाज बांधला जात आहे. परंतु याबाबत आंबेडकरांना कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसल्याने पुणेकरांना वाट पाहावी लागणार आहे. 

पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे कसबा विधान सभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोनही उमेदवारांची क्रेझ पुणेकरांमध्ये आहे. तर दुसरीकडे वसंत मोरे देखील चांगलेच प्रसिध्द आहेत. वसंत मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तर फारसा फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र जर वसंत मोरे वंचितचे उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे गेले तर दमदार लढाई होऊन अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागण्याच्याही चर्चांना उधाण आले आहे. आधीच धंगेकरांमुळे मोहोळ यांचे टेन्शन वाढलेले असताना मोरे वंचित मधून आले तर मोठा फटका बसू शकतो. असे राजकीय गणितांवरुन सध्यातरी दिसून येत आहे. 

 वसंत मोरे यांच्याशी चर्चा केली. आम्ही ३१ मार्चपर्यंत अधिकृत निर्णय जाहीर करू.  राज्यात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात कशी होणार आणि कोण करणार याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. काही चर्चेची घोषणा अद्याप करता येणार नाही.

  - प्रकाश आंबेडकर, वंचित आघाडीचे नेते. 

पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मला येथे आमंत्रित केले, हे मी माझे भाग्य समजतो. आमची सकारात्मक चर्चा झाली. कात्रज पॅटर्न राबवून पु्ण्यात कसा लागू करता येईल हे पटवून दिले. तसेच लोकसभेला मी निवडणूक कोणत्या आधारावर येवू शकते हे त्यांच्यापुढे मांडले. वंचितचे पुण्यात सुमारे ७० हजार मतदान आहे. तसेच आंबेडकरी चळवळीला माननारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पुण्यातून वेगळा निकाल लागू शकतो. पुण्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ आहे.  कोणता मार्ग स्वीकारायचा हे येत्या काही दिवसांत ठरवले जाईल. पुणे लोकसभेसाठी वंचित उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील.

- वसंत मोरे, पुणे लोकसभा मतदार संघाचे इच्छूक उमेदवार.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest