पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात: म्हणाले, शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार

पुणे: शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार, सरदार) आहेत, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर घणाघात करत भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले. अमित शाह यांनी मराठा आरक्षणावरूनही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 11:14 am
Amit Shah, Sharad Pawar, BJP, NCP, Pune

संग्रहित छायाचित्र

भाजपच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले 

पुणे: शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार, सरदार) आहेत, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर घणाघात करत भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले. अमित शाह यांनी मराठा आरक्षणावरूनही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी अधिवेशन पुण्याच्या बालेवाडीत झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अमित शाह यांनी भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.

अमित शाह म्हणाले, विरोधक भ्रष्टाचाराची गोष्ट करत आहेत. देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात ? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी जाहीरपणे हे तुम्हाला सांगत आहे. आमच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताय? आता शरद पवारजी आमचा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे.

तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. घरोघरी जाऊन या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करायचा आहे. हे खोटं बोलतील आणि भ्रम निर्माण करतील. प्रत्येक कार्यकर्ता हा कमळसाठी समर्पित असावा. प्रत्येक कार्यकर्त्याने कमळ जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत येणार हे मला स्पष्ट दिसत आहे. भाजपच्या नेतृत्वातच महायुतीचे सरकार असणार आहे. मला आज कार्यकर्ते भेटत आहेत. मी त्यांच्याशी बोललो, पण कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत. भ्रम पसरवण्याचे काम विरोधकांनी केले आहे. नेतृत्वाबाबत अमित शाह यांनी विधान करताना विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे असण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

पराभूत होऊन अहंकार
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकला, विरोधी पक्ष काँग्रेस पराभूत झाला. माझ्या राजकीय जीवनात मी विजयी झाल्यावर अहंकार निर्माण झालेले पाहिले आहेत.
मात्र, पराभूत होऊन जगात अहंकार निर्माण झालेले राहुल गांधी हे एकमेव उदाहरण आहे. त्यांचा अहंकार उतरवण्यासाठी प्रचंड बहुमताने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमध्ये सत्ता आणायची आहे, असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे. ते म्हणाले, विरोधकांनी म्हटलं, भाजप आरक्षण संपवत आहे. आम्ही उत्तर देताना काही ठिकाणी संकोच करत होतो. लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाला. मी आज सांगायला आलो आहे की, १० वर्षे काम करण्याची संधी नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मिळाली. या काळात पूर्ण बहुमत असतानाही आरक्षणाला बळ देण्याचं काम आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. विरोधकांनी संविधानाचा विषय काढला. आम्ही उत्तर दिलं. आता निवडणूक महाराष्ट्रात आहे. आता नव्यानव्या प्रकारचे गैरसमज शरद पवार उभे करत आहेत.

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे नेते
उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते असल्याची खोचक टीका करून अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी तुष्टीकरणाच्या ऐवजी सर्वांना न्याय देण्याचं काम केले आहे. आतंकवादाला मुळासकट फेकून टाकण्यासाठी निर्णय घेतले आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. देशाच्या सुरक्षेला औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करू शकत नाही. भाजप करू शकते. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? आघाडीवाले आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, श्रीमान उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले. स्वत:ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. उद्धवजी याकूबला सोडवण्याची मागणी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात. झाकीर नाईकच्या समर्थकांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हा औरंगजेब फॅनक्लब महाराष्ट्र आणि देशाला सुरक्षा देऊ शकतो का, असा प्रश्न करत देश आणि महाराष्ट्राला सुरक्षा ही केवळ भाजप देऊ शकते असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसवर आरोप
बंधू आणि भगिनींनो मी नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत आलो आहे. मी अभ्यासाच्या आधारावर सांगू शकतो की, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितका काँग्रेसने केला आहे तितका इंग्रजांनी सुद्धा केला नव्हता, असा आरोप अमित शाह यांनी केला. ते म्हणाले, ही गोष्ट आपल्याला घरोघरी जाऊन सांगायची आहे. बाबासाहेबांशी जोडलेले ५ तीर्थ बनवण्याचं काम भाजप पक्षाने केलं. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार काँग्रेस पक्ष असताना मिळाला नाही. नरेंद्र मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या आठवणीत दिल्लीतही त्यांचं भव्य स्मारक बनवण्याचं काम सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकारने देशाची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. नक्षलवादाच्या त्रासाला आता समाप्तीच्या मार्गावर आणले आहे. मी आज आपल्याला सांगून जातो की, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगा की, पुढच्या दोन वर्षात हा देश नक्षलवाद्यांपासून मुक्त होणार, यात कोणतीही शंका नाही.

गडकरींची अनुपस्थिती 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे  अधिवेशनाला अनुपस्थित होते. आपल्या गैरहजेरीची माहिती स्वतः नितीन गडकरी यांनी दिली आहे. पुणे येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकणार नाही, असे नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. याबद्दल सर्व कार्यकर्त्यांप्रती  त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अधिवेशनासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. पोस्टमध्ये गडकरी म्हणतात,  या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आपण नव्या ऊर्जेने पक्षाच्या मजबुतीसाठी कार्य कराल, हा विश्वास आहे.

पवार सत्तेत आल्यास मराठा आरक्षण गायब 
आरक्षणावर पवार यांच्यावर टीका करताना शाह म्हणाले, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण उत्तर देत आहेत. माझे एक निरीक्षण आहे, ते मी आता तुमच्यासमोर सांगत आहे, महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येते, मराठा समाजाला आरक्षण मिळते आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. मी विचार करून हे वाक्य बोलतो आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपचं सरकार आलं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. आम्ही पुन्हा आलो. आम्ही आतासुद्धा मराठा आरक्षण देण्याचं काम केलं आहे. शरद पवार यांचं सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर कुणाचं सरकार आणलं पाहिजे? समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम भाजपने केलं आहे. तुम्ही खोटेपणा पसरवत आहात. जुना निर्णय असून त्याच्या नोटिफिकेशनची माहिती व्हायरल करता. मी मंत्री पीयूष गोयल यांना विचारलं, ते म्हणाले, हा आपला निर्णय नाही तर शरद पवार यांच्या सरकारचा निर्णय आहे. ते म्हणत आहेत की, दुधाची पावडर आयात होते. गोंधळात पडू नका, ते सर्क्युलर काढून गेले होते, नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत एक किलोदेखील दुधाची पावडर आयात केलेली नाही. पुढच्या पाच वर्षांपर्यंत १ ग्रॅमही दुधाची पावडर आयात केली जाणार नाही. हे खोटं पसरवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest