संग्रहित छायाचित्र
मुंबई : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत असून भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दुसऱ्या बाजूला गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ असलेले माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. यामुळे एका दिवसांत भाजपाला दोन जोरदार धक्के बसले आहेत.
संजयकाका पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने तासगावसह सांगलीच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतल्याचा खुलासा संजयकाका पाटील यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची उमेदवारी दोन महिन्यांपूर्वीच पवार यांनी कवठेमहांकाळ येथे शेतकरी मेळाव्यात जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या संजयकाका पाटील यांनी एका पराभवाने आपण खचून जाणार नसून, विधानसभेची निवडणूक ताकदीने लढविण्याचे संकेत तासगावमधील दहीहंडी कार्यक्रमात दिले होते. तसेच भाजपचे मतदारसंघ प्रचारप्रमुख प्रभाकर पाटील यांना मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन करीत चिरंजीवाच्या उमेदवारीचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते.
या पार्श्वभूमीवर बुधवारी पाटील यांनी पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कोणती राजकीय खलबते पार पडली याबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या भेटीसंदर्भात पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही भेट केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण देण्यासाठी होती. पुतळा उभारणी समितीचा मी स्वागताध्यक्ष आहे. या नात्याने ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली.
दक्षिण महाराष्ट्रात ही घडामोड घडत असताना गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अगरवाल यांची भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत या भागात भाजपाचा जोरदार प्रचार करणारे गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपावर टीकास्र सोडलं आहे.
गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित होताच भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी मी मोठ्या अपेक्षेने या भागाच्या विकासाची हमी घेऊन भाजपात गेलो होतो. आमच्याकडच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच भाजपाचा पराभव करण्याचं काम केलं. मी गेल्या पाच वर्षांत इमानेइतबारे भाजपाचं पूर्ण निष्ठेनं काम केले. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणुकांमध्ये मी गोंदियात न भूतो न भविष्यती असं मोठं मताधिक्य भारतीय जनता पक्षाला मिळवून देण्याचं काम केलं. तरीही गेल्या ५ वर्षांत भाजपामध्ये माझ्याप्रती विश्वास व सहकार्याची भावना मला खूप कमी दिसली.
स्थानिक बंडखोर आमदारांना भाजपप्रणीत महायुती सरकारची साथ मिळत असल्याचा आरोपही अगरवाल यांनी केला. ते म्हणाले, माझ्यासमोर उभे राहिलेल्या बंडखोर आमदारांना भाजपा सरकारची पूर्ण साथ मिळत आहे. त्यामुळे मला वाटतं की, या भागात फक्त लूट चालू आहे. कोणताही चांगला उपक्रम इथे सुरू होऊ शकत नाही. आमच्याकडच्या सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचं कोणतंही काम झालं नाही.
काँग्रेसने गोंदियाची जागा लढवावी
जागावाटपामध्ये काँग्रेसनं गोंदियाची जागा स्वत:कडे घ्यावी, अशी मागणी गोपालदास अगरवाल यांनी केली आहे. ते म्हणाले, माझी एकच मागणी आहे की, काँग्रेसनं गोंदियातून लढायला हवं. मविआच्या सर्व घटक पक्षांनी गोंदियात विजय मिळावा यासाठी काँग्रेसला उमेदवारी दिली पाहिजे. मीही इच्छुक असणार आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. पाच वर्षांपूर्वी माझ्यामुळेच काँग्रेसला आमच्या विधानसभा क्षेत्रात, गोंदिया जिल्ह्यात फटका बसला होता. त्यामुळे मी परत काँग्रेसमध्ये येत असताना खर्गे, नाना पटोले यांच्याकडून खात्री घेतली आहे की, गोंदियातून काँग्रेस निवडणूक लढणार. उमेदवार कुणीही असो. गोंदिया हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जात नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे राजकीय गुरू राहिले आहेत. त्यांनीही मला सांगितलं की गोंदिया काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यादृष्टीने तुम्ही विचार करा. प्रफुल्ल पटेल काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांचा बालेकिल्ला होता. आता हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आत्तापर्यंत इथे १४ निवडणुकांपैकी ११ निवडणुकांमध्य काँग्रेसचा विजय झाला आहे. गेल्या निवडणुकीत माझ्यामुळेच काँग्रेसची पीछेहाट झाली. यावेळी आम्ही मोठ्या मताधिक्याने काँग्रेससाठी विजय मिळवणार.