हर्षवर्धन पाटलांच्या हाती ‘तुतारी’
माजी मंत्री आणि इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सोमवारी प्रवेश केला. इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानावर जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता इंदापूरातून पाटील हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरील उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरात पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी दत्ता भरणे यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांची लढत होणार आहे.
२०२३ च्या जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार गेले. यामध्ये इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा समावेश होता. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे भाजपामध्ये राहून हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणे कठीण होते. कारण महायुतीत जिथे ज्यांचा आमदार ती जागा त्या पक्षाला असा नियम आहे. शेवटी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असे ठरवून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना २५ हजारांचे मताधिक्य होते. पक्षप्रवेशावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्या आधीच्या तीन निवडणुकांमधील विजयामध्ये आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. परंतु गेल्या निवडणुकीत आमचा सहभाग अदृश्य होता. सुनेत्रा पवार यांचा बारामतीतील पराभव आणि इंदापूरातील सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यामागे कोण होतं ते पाटील यांनी यावेळी सांगून टाकलं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.