संग्रहित छायाचित्र
विधानसभेचे नागपूर अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना रेशीमबागेतील संघ मुख्यालयात निमंत्रित केले होते. अनेक आमदार आणि मंत्र्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. या ठिकाणी महायुतीच्या आमदारांचे बौद्धिक घेण्यात आले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याचे टाळले. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, पंकज भोयर, चित्रा वाघ, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, शिवेंद्रराजे भोसले, संजय राठोड, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे, नीलेश राणे, राम शिंदे, प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. मात्र या यादीत अजित पवार यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी देखील संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. तेव्हाही अजित पवार अनुपस्थित होते. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हे रेशीमबागेत दाखल झाले. आपण स्वयंप्रेरणेने संघाच्या मुख्यालयात दाखल झालो असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाच्या मुख्यालयाच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे सांगितले. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतूनच कामाची सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघ निरपेक्ष भावनेने काम कसे करावे हे शिकवत असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.