संग्रहित छायाचित्र
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ठाकरे-फडणवीस यांची ही भेट राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिंदे गटातील काही नेत्यांनीही या भेटीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. या भेटीच्या दरम्यान आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले जाते. (Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meeting)
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. या शपथविधीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातील इतर काही नेत्यांनी शपथविधीला हजेरी लावली नाही. पण त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी आता नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सहा ते सात मिनिटे चर्चा झाली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं बोलले जात आहे.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे देखील आज विधिमंडळात उपस्थित होते. नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसारख्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. त्यानंतर, ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे, तसेच शिंदे गटातील काही नेत्यांनी या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबले जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.