संग्रहित छायाचित्र
गेली २५ वर्षांपासून घनसावंगी मतदारसंघात (Ghansawangi Assembly constituency) वर्चस्व राखणाऱ्या राजेश टोपे यांच्या गडाला शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उढाण यांनी सुरुंग लावला. शिवसेनेचे हिकमत उढाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेशभैय्या टोपे, भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सतीश घाटगे, वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी खाटके असे उमेदवार घनसावंगीच्या मैदानात होते. परंतु या निवडणुकीतील मुख्य लढत ही शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेशभैय्या टोपे यांच्यातच झाली. मागील २५ वर्षे मतदारसंघावर वर्चस्व टिकवणाऱ्या या टोपे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. उढाण यांनी टोपे यांचा २३०९ मतांनी पराभव केला. टोपे यांना ९६ हजार १८७ मते मिळाली. तर उढाण यांना ९८ हजार ४९६ मतदान झाले.
महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांसोबतच मनोज जरांगे फॅक्टर, ओबीसी आंदोलन, साखर कारखान्याचा प्रश्न असे मुद्दे घनसावंगीच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहिले. मुंबईमध्ये उद्योगपती असलेले हिकमत उढाण यांना गेल्या तीन निवडणुका टोपे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र यंदा त्यांच्या दीर्घ प्रयत्न आणि तयारीला यश आले. अतिशय घासून झालेल्या या निवडणुकीत उढाण यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना धूळ चारली.
ओबीसी फॅक्टर:
आरोग्यमंत्री म्हणून काम करताना राजेश टोपे यांनी ‘कोविड-१९’ महासाथीत कौतुकास्पद काम केले होते. यंदाच्या निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र त्याशिवाय इतर मुद्दे टोपे यांच्या विरोधात राहिल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. टोपे यांच्या पराभवाला काही महत्त्वाचे मुद्दे कारणीभूत ठरले. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे ओबीसी समाजाची नाराजी. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी हे गाव घनसावंगीच्या जवळ. तसेच टोपे यांनी सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे जरांगे फॅक्टर हा घनसावंगीमध्ये महत्त्वाचा ठरला. मात्र याउलट त्याचा तोटाच टोपे यांना झाला. मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही बाजूंनी घनसावंगीमध्ये प्रचार झाला. ओबीसी नेत्यांच्या मोठ्यामोठ्या सभा मतदारसंघात झाल्या. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टोपे यांच्या विरोधात गावागावात सभा घेतल्या. त्यामुळे ओबीसी समाजात टोपे यांच्या विरोधात नाराजी पसरली. तसेच महायुतीबद्दल ओबीसी समाजाचे मत हे सकारात्मक राहीले. त्याचा फायदा उढाण यांना झाला.
घनसावंगी मतदारसंघातील बहुसंख्य उमेदवार हे मराठा समाजातील होते. मराठा मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे दिसले. टोपे यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे मराठा मतदान मोठ्या प्रमाणात टोपे यांना होईल असे वाटले होते. मात्र मतांमध्ये फूट पडल्याने तसे घडताना दिसले नाही. तसेच ओबीसी मतदानदेखील टोपे यांच्या विरोधात झाले.
गेली २५ वर्षे टोपे घनसावंगीचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे तोच नेता, तेच कार्यकर्ते या प्रकाराला लोक कंटाळले. टोपे यांना 'अॅंटी इनकंबंन्सी'चा फटका बसला. तसेच मतदारसंघातील विकासकामांकडे टोपे यांचे दुर्लक्ष झाल्याचे देखील संगितले जाते. मतदारसंघात एमआयडीसी नसणे तसेच साखर कारखान्याचे अनेक प्रश्न टोपे यांना भोवले. टोपे यांनी मतदारसंघातील साखर कारखान्यात शेतकऱ्यांची काही बिले तसेच रकमा अडवून ठेवल्याचे आरोप झाले. प्रतिस्पर्धी उमेदवार हिकमत उढाण यांनी शेतकऱ्यांचा हा मुद्दा लावून धरत प्रचार केला. त्याचा फायदा उढाण यांना झाला.
हिकमत उढाण हे मुंबईमधील मोठे उद्योगपती आहेत. मात्र निवडणुकीसाठी ते मतदारसंघात येवून राहिले. मागील तीन निवडणुकींत त्यांनी टोपे यांना तगडे आव्हान दिले होते. निवडणुकीपूर्वी ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात होते. मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ टोपे यांना गेला. तसेच महायुतीकडे टोपे यांच्या विरोधात कुणीही प्रबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे उढाण यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवली. उढाण गेली काही वर्षे मतदारसंघात काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदार संघात सहानुभूती निर्माण झाली. त्याचा फायदा उढाण यांना झाला. आमदार म्हणून निवडून आल्यावर आता उढाण यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. मतदारसंघातील रस्त्याची कामे, एमआयडीसीचा सुरू करणे यासोबतच ऊस क्षेत्र वाढीसाठी एक्सप्रेस कालवा तयार करावा आणि नवीन साखर कारखाना सुरू करावा अशा मागण्या मतदारसंघातील नागरिक करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.