संग्रहित छायाचित्र
महायुतीच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ हे लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याचे कळते. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचीदेखील माहिती सूत्रांकडून मिळाली. असे झाल्यास तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकरिता मोठा धक्का ठरणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,भुजबळ यांना पक्षात घेण्याकरिता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी राज्यातील नेत्यांची चर्चा झाली आहे. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर जानेवारी महिन्यात भुजबळ यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. भाजपच्या वाट्यातील एक मंत्रिपद सध्या रिक्त आहे. हे मंत्रिपद भुजबळ यांना देण्यात येईल, असेदेखील सूत्रांनी सांगितले. यामुळेच भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार भाजपकडून सुरू असल्याचेदेखील बोलले जात आहे.
या सर्व घडामोडी सुरू असताना भुजबळ कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील मोठे ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे. गेल्या दोन दिवसांपासून भुजबळ नाशिकमध्ये समाजातील अनेक नेत्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेत आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात भुजबळ यांचे जाळे पसरलेले आहे. यामुळे भुजबळ यांना पक्षात घेण्याकरिता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाला. राज्यात तसेच देशात भुजबळांचा ओबीसी चेहऱ्याचा फायदा भाजप या माध्यमातून घेण्याच्या तयारीत आहे.
फडणवीस यांच्यासोबत जवळीक
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज भुजबळांनी थेट ‘कसला वादा अन् कसला दादा,’ असे म्हणत थेट पक्षश्रेष्ठींवरच हल्लाबोल केला. एवढेच नव्हे तर, ‘जहां नहीं चैना वहां नही रहना,’ असे म्हणत त्यांनी बंडाचे संकेत दिले. भुजबळ आपल्या नव्या राजकीय इनिंगची सुरूवात भाजपमध्ये प्रवेश करून करण्याची दाट शक्यता आहे. ‘‘मंत्रिपदाचा प्रश्न नाही, अवहेलना झाली. पद कुणी नाकारलं, हे शोधावं लागेल. माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते,’’ या भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजप आणि फडणवीसांच्या अधिक जवळ गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते आगामी काळात भाजपच्या गोटात दाखल होऊन महाराष्ट्र किंवा दिल्लीत यापैकी कुठेही काम करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.