संग्रहित छायाचित्र
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या मोनिका राजळे यांनी विजयाची हॅटट्रिक केली. मतमोजणी सुरू असताना सुरुवातीला त्यांचा पराभव होईल की काय असे वाटत असतानाच शेवटच्या टप्प्यात त्या विजयाकडे मार्गस्थ झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील तर अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे हे उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी सुरू असताना माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील सुरवातीला आघाडीवर होते. शेवगावनंतर पाथर्डीतील मतपेट्यांची मोजणी सुरू झाली. तेव्हा राजळे यांनी मतांची आघाडी घेतली. घुले मागे पडले. त्यानंतर राजळे आणि ढाकणे यांच्यात लढत सुरू झाली. परंतु ढाकणे यांना मागे टाकत राजळे पुढे निघून गेल्या. तब्बल १९ हजार ४३ मतांनी त्यांचा विजय झाला. राजळे यांना ९९ हजार ७७५ इतके मतदान झाले. तर त्यांचे विरोधी उमेदवार ढाकणे यांना ८० हजार ७३२ तर घुले पाटील यांना ५७ हजार ९८८ इतकी मते मिळाली.
मोनिका राजळे यांच्याविषयी :
शांत आणि मनमिळाऊ राजकारणी अशी ओळख असलेल्या मोनिका राजळे या २०१४ साली पहिल्यांदा भाजपाच्या तिकिटावर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून निवडून आल्या. सासरी त्यांना राजकारणाचा वारसा लाभला. त्यांचे सासरे अप्पासाहेब राजळे हे माजी आमदार होते. तसेच त्यांचे पती दिवंगत राजीव राजळे हे देखील माजी आमदार होते. २०१४ मध्ये त्या पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या सहानूभूतीच्या लाटेमुळे त्या निवडून आल्या असे त्यावेळी बोलले गेले. मात्र २०१९ मध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोध होवूनही त्यांनी विजय खेचून आणला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी स्वपक्षीयांनी त्यांच्या विरोधात मेळावा घेतला. तालुक्यातील अनेक पदाधिकारी या मेळाव्यास हजर होते. “राजळे हटाव, भाजप बचाव” अशा घोषणा देत राजळे यांच्या विरोधात मोहीम चालवली गेली. मात्र या सगळ्यावर मात करून त्यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवली आणि निवणूक जिंकून दाखवली. मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे हे उच्च शिक्षित आणि अभ्यासू आमदार म्हणून प्रसिद्ध होते. तरुणांमध्ये ते लोकप्रिय होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे. २०१७ मध्ये राजीव राजळे यांचे निधन झाले. मात्र पतीच्या निधनानंतर त्या खचून गेल्या नाहीत. आमदारकी सोबतच २०२१ मध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी त्या बिनविरोध निवडून आल्या. २०२४ ला भाजपाने पुन्हा एकदा विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला.
२०२४ ची निवडणूक
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नगरमधून अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांचा मोनिका राजळे यांनी जोरदार प्रचार केला. त्यामुळे काही ठिकाणी त्यांना नाराजीला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणूक सोपी नसणार हे हेरून त्यांनी तयारी सुरू केली होती. पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांनी त्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांची कोंडी झाली होती. तसेच दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक हर्षदा काकडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवून चुरस निर्माण केली होती. काकडे यांच्या उमेदवारीमुळे राजळे यांना फटका बसणार असे सांगितले जात होते. २०१४ आणि २०१९ मध्ये काकडे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. गेली चाळीस वर्षे हर्षदा काकडे आणि त्यांचे पती विद्याधर काकडे हे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे सुरुवातीला इतर उमेदवारांपुढे मोठे आव्हान उभे राहिल्याचे बोलले गेले. तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील राष्ट्रवादीतील फूटीनंतर अजित पवार यांच्याबरोबर गेले. मात्र महायुतीकडून राजळे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पेच निर्माण झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. लोकसभेनंतर लगेचच त्यांनी तयारीला सुरुवात केली होती. त्यांनी राजळे यांना वेळोवेळी आव्हान दिले. त्यासोबतच आधी भाजपामध्ये असेलेले प्रतापराव ढाकणे पुढे शरद पवार यांच्याबरोबर गेले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठी ताकद उभी केली. युवकांचे संघटन केले. व्यापारी आणि बाजारपेठेशी त्यांचा थेट संबंध असल्याचा त्यांना फायदा होईल असे मानले जात होते. मात्र या सगळ्यावर मात करत राजळे यांनी विजयाची हॅटट्रिक करत विधानसभा गाठली. त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांच्या सभा झाल्या. या सभांचा त्यांना फायदा झाला.
शिरसाठवाडी येथील दगडफेक
मतदानाच्या दिवशी मोनिका राजळे या शिरसाठवाडी मतदान केंद्रावर गेल्या होत्या. यावेळी शेकडो युवक मतदान केंद्राबाहेर जमा झाले. त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. राजळे यांच्या दिशेने दगडफेक देखील करण्यात आली. यावेळी मोनिका राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःला एका वर्ग खोलीत बंद करून घेतले. जमाव चालून आल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस बंदोबस्त कमी असल्याने राजळे या बाहेर येण्यास तयार नव्हत्या. सुमारे दोन तासांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत मतदानकेंद्रात बसून असलेल्या राजळे तिथून बाहेर पडल्या. मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न जमावाने केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा जमाव राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचा दावा राजळे यांनी केला. तिथून त्या पाथर्डीला आपल्या निवासस्थानी आल्या. या सगळ्या प्रकारामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेक करणाऱ्या तरूणांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी राजळे समर्थकांनी केली. मात्र या तरुणांची करियर बरबाद होवू नये म्हणून आपण गुन्हा दाखल करणार नसल्याचे राजळे यांनी सांगितले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.