संग्रहित छायाचित्र
रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भुजबळ आणि पडळकर यांना मंत्रिमंडळातून डावलून ओबीसी मतांचा अपमान केल्याचा घणाघात हाके यांनी केला आहे. तसेच छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी हाके यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, या सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांची टक्केवारी वाढली असून १५ ते १६ ओबीसी नेत्यांना मंत्रीपद मिळालं आहे. याबद्दल आम्हाला आनंद आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल आनंद आहे. पण ओबीसी प्रश्नावर ठाम भूमिका मांडणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना का डावलले गेले, याचे उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना मिळाले नाही. तसेच गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे. या नेत्यांना मंत्रीमंडळातून का डावलण्यात आले, याचे उत्तर समाजाला हवे असल्याचे हाके यांनी सांगितले.
विधीमंडळातील ज्येष्ठ सदस्य असतानाही अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना का डावलले याचे उत्तर अजित पवार यांनी द्यावे. अडीच वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या छगन भुजबळ यांना अजित पवार अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद देणार असल्याचे स्पष्ट करावेत. आम्ही सर्व शांत बसू. तसेच छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी हाके यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने राज्यातील ओबीसी जनतेने मतदान केले आहे. परंतु त्या मतदानाचा अपमान अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.