संग्रहित छायाचित्र
नागपूरात सुरू असलेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या हालचालींनी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनीही अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या वाढत्या भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यापूर्वी दिल्लीतील एका भेटीत अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त असल्याचे सांगण्यात आले, पण ती राजकीय असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यातच आमदार अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील सत्तेत सहभागी होणार असल्याचे सूतोवाच केल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
आमदार रोहित पाटील यांचे स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या आमदार रोहित पाटील यांनी माध्यमांसमोर भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. "मी केवळ मतदारसंघातील विकासकामांशी संबंधित पत्र द्यायला आलो आहे," असे त्यांनी सांगितले. रोहित पाटील म्हणाले, "काल विधिमंडळात मी दादांना पत्र देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी योग्य जागा नसल्याचे सांगून मला आज सकाळी बंगल्यावर भेटण्यास सांगितले. माझ्या मतदारसंघात ऊर्जा विभागाकडून नवीन डीपी लागणार आहेत. त्या मागणीसाठी मी त्यांची भेट घेत आहे."
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार की हा केवळ सत्तास्थानी असलेल्या नेत्यांसोबत कामांसाठी झालेला संवाद आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. आगामी काळात या हालचालींचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर नागपूर अधिवेशनातील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.